Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 12:10 PM2020-03-06T12:10:42+5:302020-03-06T12:16:44+5:30

Holi 2020 : आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते.

Holi Special : How to make poorapoli easier and testier myb | Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

Holi special : पुरणपोळ्या मऊ होण्यासाठी वापरा या टिप्स, खाणारेही म्हणतील वाह क्या बात है...

googlenewsNext

होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.  सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी तयार केली जाते. महिलांची पुरणपोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरचं जीभेवर विरघळतील अशा असाव्यात. कारण आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या ते सांगणार आहोत. 


सगळ्यांच्या घरी पुरणपोळी वेगवेगळी असते. वरचं आवरण अत्यंत पातळ असणारी, पुरेसं गोड आणि भरपूर पुरण भरलेली, उत्तम भाजलेली तेजस्वी पुरणपोळी करणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. कुठे तिचं आवरण जाड असतं, तर कुठे पोळीला खुसखुशीतपणाच नसतो. कुठे ती पुरेशी गोड नसते, तर कुठे पुरणाची पोळी असूनही पुरण अगदीच नावाला भरलेलं असतं, तर कुठे पुरणपोळी नीट भाजलेलीच नसते.

पुरणपोळीची सुरुवात पुरणापासून होते. त्यासाठी चणाडाळ अगदी उत्तम शिजवून चाळणीत घालून निथळून घेतलेली असते. निथळून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला गूळ घालून पातेलं मंद विस्तवावर ठेवलं जातं. हळूहळू गूळ विरघळून डाळीशी एकजीव होऊ लागतो. प्रथम जरा पातळ होऊन पुरण हळूहळू घट्ट होऊ लागतं. 


पुरण फारच मऊ असताना गॅसवरून उतरवलं तर त्यात थोडा पाण्याचा अंश (डाळीतील) राहिल्यानं कणकेच्या पारीमध्ये ते भरलं की पारी ओलसर होऊन फाटू शकते. ती फाटू नये यासाठी मग जाड करावी लागते ज्यामुळे पुरणपोळीवरचं आवरण जाड होतं. याउलट पुरण फार कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवलं तर ते फळफळीत होतं आणि पोळी लाटताना नीट पसरलं जात नाही. पुरण बरोबर झाल्याचा निकष म्हणजे त्यामधे झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो. असं झालं की पुरण गॅसवरून उतरवून गरम असतानाच पुरणयंत्रातून वाटून घ्यावं.
पुरण वाटल्यावर त्यात अत्यंत बारीक वेलचीपूड आणि जायफळपूड घालून एकत्र करून पातेल्यावर कागद टाकून झाकून ठेवावं. पातळ टॉवेल झाकण म्हणून टाकला तरी चालतो. यामुळे वाफ धरून ती पुरणात पडत नाही आणि पुरण ओलसर होत नाही. या पद्धतीनं पुरणाला योग्य तेवढा मऊपणा येतो.पुरण तयार झाल्यावर कणीक भिजवायची असते. 


पोळी मऊसूत गुळगुळीत होण्यासाठी कणीक बारीक चाळणीनं चाळून घ्यावी. त्यात थोडं मीठ घालून सैलसर भिजवून अर्धा तास तरी ती तशीच ठेवावी. मग तेलाचा हात मधून मधून आणि पाण्याचा हात घेऊन ही कणीक खूप मळावी, तिंबावी. कणकेमध्ये एवढा मऊपणा आला पाहिजे की कणीक ताटावर एक फुटावर धरून हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटापर्यंत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

चाळून घेतलेली बारीक, मऊ कणीक असेल तर तार सुटण्यात अडचण येत नाही. मैद्यामध्ये कोंडा आणि बीज अजिबात नसल्यानं त्याला लवकर तार सुटते म्हणून काही ठिकाणी कणीक आणि मैदा किंवा रवा आणि मैदा पिठासाठी घेतले जातात. या कणकेची दोन रुपयाच्या नाण्याएवढी गोळी घेऊन तांदळाच्या पिठात बुडवून त्यावर त्याच्या तिप्पट ते चौपट मोठा पुरणाचा गोळा ठेवून हळूहळू पारी मोठी करून सर्व पुरण आत घालून पारी बंद करायची. तांदळाच्या पिठात घोळवून पोळपाटावर हातानं हलके सर्व बाजूंनी थापून पोळी मोठी करायची आणि मग खाली-वर तांदळाची पिठी घालून पोळी लाटण्यानं लाटून मोठी करायची. ( हे पण वाचा-फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही)


पोळी करताना अशी काळजी घ्या

पुरणपोळी भाजताना तव्याखाली विस्तव मध्यम हवा. तव्यावर पोळी वरची बाजू वरच ठेवून टाकायची. थोड्या वेळानं उलटून टाकायची. त्या पृष्ठभागावरील तांदळाचं पीठ मऊ रूमालानं काढून टाकावं. अशाप्रकारे पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर झाली की कागदावर काढून घेऊन दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवावी. गार झाल्यावर पोळ्या डब्यात भराव्यात. तयार आहेत पुरणपोळ्या. ( हे पण वाचा-चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !).

Web Title: Holi Special : How to make poorapoli easier and testier myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.