आइसक्रीमप्रेमींचा लाडाकोडाचा फ्लेवर बटरस्कॉच कसं जन्माला आलं?; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:14 AM2021-09-04T08:14:13+5:302021-09-04T08:14:31+5:30

आइसक्रीमप्रेमींचा लाडाकोडाचा फ्लेवर म्हणजे बटरस्कॉच! आहा, कॅरॅमलसारखाच तो धुंद दरवळ आणि त्यातच एकरूप झालेला दुधाळ स्वाद! बटरस्कॉच जन्माला आलं ...

How Ice Cream Lovers Favourite Flavored Butterscotch Was Born ?; Find out! pdc | आइसक्रीमप्रेमींचा लाडाकोडाचा फ्लेवर बटरस्कॉच कसं जन्माला आलं?; जाणून घ्या!

आइसक्रीमप्रेमींचा लाडाकोडाचा फ्लेवर बटरस्कॉच कसं जन्माला आलं?; जाणून घ्या!

Next

आइसक्रीमप्रेमींचा लाडाकोडाचा फ्लेवर म्हणजे बटरस्कॉच! आहा, कॅरॅमलसारखाच तो धुंद दरवळ आणि त्यातच एकरूप झालेला दुधाळ स्वाद! बटरस्कॉच जन्माला आलं इंग्लंडमधल्या यॉर्कशर परगण्यातल्या डाँकॅस्टर गावातल्या एका गोडधोड विकणाऱ्याच्या घरी. त्याचं नाव सॅम्युअल पार्किन्सन. काहीतरी नवीन बनवू म्हणत त्याने काकवी आणि लोणी एकत्र चुलीवर चढवलं, किंचित मीठ घातलं आणि बराच वेळ उकळल्यावर एक कडक टॉफीसारखी चघळचिक्की तयार झाली, तेच पहिलं बटरस्कॉच.

नावातला बटर हा भाग ठीक आहे; पण स्कॉच?  काहींच्या मते त्याचं नातं आहे स्कॉटलंडशी तर काही जण सांगतात की मुळात हा शब्द होता स्कॉर्च, म्हणजे चरचरीत तापवणे. पण, बटरस्कॉच म्हणजे नुसतं कॅरॅमल मात्र नव्हे. बटर हे त्याचं अविभाज्य अंग आहे.   
या खुटखुटीत चिक्कीमुळे पार्किन्सनला वारेमाप प्रसिद्धी मिळाली. सर्दीच्या दिवसांत घशाला, छातीला आरामदायक अशीही बटरस्कॉचची ख्याती झाली.

१८५१ मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाने या लहानशा गावाला भेट दिली तेव्हा तिला डबा भरून बटरस्कॉच कॅन्डी नजर करण्यात आली होती. त्यामुळे बटरस्कॉचचं नातं पार राजघराण्याशी जोडलं गेलं. इंग्लंडबाहेर, विशेषतः अमेरिकेत त्याने अधिराज्य केलं. पुढे अनेकांनी तो यशस्वी फॉर्म्युला वापरून आपले निरनिराळे पदार्थ घडवले. त्यातही बदाम, काजू, शेंगदाण्याच्या कुटाशी बटरस्कॉचने चांगलंच जुळवून घेतलं. पण, आद्य कृतीतली काकवीची जागा आता तपकिरी साखरेने घेतली.

आज बटरस्कॉच नावाच्या त्या मूळ स्वरूपातल्या गोळ्या (कॅन्डी) मिळतात, मात्र कॅन्डीपेक्षाही लोकप्रिय झालं ते बटरस्कॉचमध्ये भरपूर मलई घालून तयार झालेलं सॉस. हेच ते आइसक्रीमचं टॉपिंग; आणि आइसक्रीम खाताना मध्येच दाताखाली जे चिटुकले कण येतात तो असतो टणक बटरस्कॉच कॅन्डीचा चुरा. त्याच्यामुळेच तर खरी मजा येते. पण, अलीकडे अस्सल बटरस्कॉच बनवलं जात नाही, केक असो किंवा कुकीज, पुडिंग.. बटरस्कॉचऐवजी त्याच्या स्वादाचा इसेन्स घालूनच काम साध्य होतं. बहुधा अशा नकलीपणामुळेच एकेकाळी अमेरिकेत सुपरहिट असलेल्या या फ्लेवरच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलीये.  भारतात मात्र बटरस्कॉच आइसक्रीम आणि केक्सची अजूनही चलती आहे.

Web Title: How Ice Cream Lovers Favourite Flavored Butterscotch Was Born ?; Find out! pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.