Tasty Gajar Halwa: तोंडाला पाणी सुटेल, असा खास स्वादिष्ट गाजराचा हलवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 11:26 AM2019-11-26T11:26:29+5:302019-11-26T11:36:53+5:30
Tasty Gajar Halwa: हिवाळा सुरु झाल्याने बाजारात लाल लाल गाजरं दिसायला सुरुवात झाली आहे.
(Image credit- Youtube)
हिवाळा सुरु झाल्याने बाजारात लाल लाल गाजरं दिसायला सुरुवात झाली आहे. गाजरापासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी गाजराचा हलवा हा पदार्थ अनेकांच्या घरी आवडीने बनवला जातो.,. आणि चवीने खाल्ला ही जातो. त्याच त्याच स्वीट डीश खाऊन जर कंटाळा आला असेल. तर या हिवाळ्यात अगदी कमी वेळात तयार होणारा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा. या हलव्याचा आस्वाद घेतल्यानंतर घरातील मंडळी नक्की खूश होतील. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करायचा गाजराचा हलवा.
साहित्य :
४ कप गाजराचा कीस ( अंदाजे ४-५ मध्यम गाजरं)
४ टेबलस्पून साजूक तूप
१/२ कप साखर
१/२ टीस्पून वेलचीपूड
२ टेबलस्पून बेदाणे
२ टेबलस्पून बदामाची कापं
१ कप दुध
१/४ कप + १ टेबलस्पून किसलेला खवा
कृती :
१ नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करा. आणि त्यात गाजराचा कीस घालून १०-१५ मिनिटे परतून घ्या. परतून किसाचे प्रमाण थोडे कमी झालेले दिसेल आणि त्याला चकाकी येईल.
२ कीस चांगला शिजला आहे. याची खात्री करून त्यात साखर घाला. आणि चांगले एकत्र करा. ५-७ मिनिटे परता.
३ त्यात वेलची पूड, बेदाणे आणि बदाम घाला. दुध घालून दुध आटे पर्यंत परता.
४ २ टेबलस्पून कोमट दुधात केशर खलून ठेवा.
५ वेगळ्या भांड्यात खवा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. त्याला किंचित तूप सुटेल. खवा आणि केशरी दुध परतलेल्या गाजराच्या किसात मिक्स करा.
६ सगळा हलवा पुन्हा एकदा परतून घ्या. आणि गरम किंवा थंड आवडी प्रमाणे सर्व्ह करा.
(सौजन्य-Ruchkarmejvani)