रगडा पॅटीसवर सॉस घ्याल, तर नरकात जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 01:24 PM2023-08-11T13:24:21+5:302023-08-11T13:24:29+5:30

व्युत्पत्ती कुठली हे नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधण्यासारखे. पण कोणत्याही खवैया भारतीय माणसाला या जोडीची ओळख करून द्यायला नको.

If you get sauce on a ragda pattis, you'll go to hell! | रगडा पॅटीसवर सॉस घ्याल, तर नरकात जाल!

रगडा पॅटीसवर सॉस घ्याल, तर नरकात जाल!

googlenewsNext

खाण्यात अनेक जोडगोळ्या असतात... वडा/समोसा-पाव, फाफडा-जिलेबी, मेदुवडा- सांबार, इडली-चटणी... आणि ही सर्व मुख्यत्वे रस्त्यावरील पदार्थांची नावे, त्यातलाच एक रगडा पॅटीस.

याची व्युत्पत्ती कुठली हे नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधण्यासारखे. पण कोणत्याही खवैया भारतीय माणसाला या जोडीची ओळख करून द्यायला नको. रस्त्यावरील भेळ/चाट वर्गात जे पदार्थ मिळतात त्यातील रगडा पॅटीस एक. 

सफेद वाटाण्याचा रगडा/साधारण घट्ट उसळ आणि त्यात पहुडलेले पॅटीस, वरून हिरवी लाल चटणी, कांदा,  कोथिंबीर, शेव आणि मसाला. वाफाळत्या रगड्याची प्लेट समोर आली की बाकी सर्व विसरले जाते. बटाटा पॅटीस आणि रगडा हे मिश्रण मुळात अफलातून. हा रगडा म्हणजे नुसते हळद, मीठ घालून वाटाणे शिजवले जातात. 
भेळ मिळणाऱ्या ठिकाणी रगडा बहुउपयोगी. पाणी/शेव/सुक्या पुरीमधे सारण म्हणून, नुसती रगडा चाट खायची असेल तर त्यासाठी. स्टो/शेगडीवर उथळ भांड्यात रगडा रटाटत असतो आणि मागणीप्रमाणे दिला जातो. वरून हिरवी आणि लाल चिंच. चटणी मात्र हवीच. बनारस, लखनौ इथे चाट मसाल्याऐवजी बुकनी म्हणून मसाला मिळतो, चाट मसाल्याचा मूळ पूर्वज तो वरून घालतात. मग बारीक शेव आणि कांदा, लिंबू, कोथिंबीर.. पाणी पुरीनंतर जशी सुकी पुरी घेतात तसे दर्दी खवैये नुसत्या रगड्यावर चटण्या घेऊन तो फस्त करतात.

हा पदार्थ मुंबईतील नाही हे मात्र नक्की. पण पाणीपुरी, भेळपुरी आणि रगडा पॅटीस ही त्रिसूत्री  निष्ठेने पाळणारे अनेक आहेत. ही डिश खायची कशी याचे पण काही संकेत आहेत! भसकन पॅटीस तोडून खायचे नसते तर अलगद सर्व मसाले चटण्या एकत्र करायच्या, मग कडेच्या रगड्याची चव घायची. इथे चटणी, कांदा यांचा फुकट रिचार्ज असतो, नंतर अंदाज घेऊन एक घास पॅटीस, एक चमचा रगडा असे करत निवांत संपवायचे. तुमचा रगडा आणि पॅटीस एकदम संपले तर तुम्ही  रस्ता खाण्यामधील महानुभाव आहात. 
आणि हो.. अस्सल रगड्यात किंवा रगड्यावर निव्वळ बारीक पिवळी शेव असते, जाडी लाल शेव नाही आणि चुकूनही यावर सॉस घ्यायचा नाही... नरकात जाण्याची शिक्षा मिळते!

Web Title: If you get sauce on a ragda pattis, you'll go to hell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.