चवीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' गोड पदार्थांचा इतिहास माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 03:28 PM2018-09-06T15:28:17+5:302018-09-06T15:47:10+5:30
भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आढळून येते. त्याचप्रमाणे मिठाई किंवा गोड पदार्थांमध्येही विविधता आढळून येते.
भारताच्या खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्याची खाद्य संस्कृती वेगळी आढळून येते. त्याचप्रमाणे मिठाई किंवा गोड पदार्थांमध्येही विविधता आढळून येते. आपल्या देशातील सण, उत्सव या गोड पदार्थांशिवाय अपूर्ण समजले जातात. सणांच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. पण यातीलच काही पदार्थांना शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. जाणून घेऊयात अशा काही गोष्टींबाबत...
गुलाबजाम
एखाद्या मिठाईच्या दुकानात गेलो की, सर्वांच्याच नजरा प्रामुख्याने एका पदार्थावर खिळतात तो म्हणजे गुलाबजाम. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, जो पदार्थ आपण लहानपणापासून खातो तो पदार्थ मुळात आपला नाहीचं. खरं तर ही मिठाई पर्शिया म्हणजेच आताच्या इराणमधील आहे. याची उत्पत्ती अरबी डेझर्ट लुकमत-ए-काधी म्हणून झाली होती. या पदार्थाने मुघल काळामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि त्यानंतर याचं नाव गुलाब जामुन असं ठेवण्यात आलं. याचा पर्शियन भाषेमध्ये गुल म्हणजे फूल आणि अब म्हणजे पाणी असा अर्थ होतो. तसेच याचा आकार भारतातील जामुन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळासारखा आहे. त्यामुळे त्यापुढे गुलाबजामुन असं जोडण्यात आलं. पुढे याचा उच्चार मराठीत करताना गुलाबजाम असा होऊ लागला.
रसगुल्ला
नरम आणि रसरशीत दिसणारा हा पदार्थ बंगाली पदार्थ म्हणून ओळखला जातो. एखादा कार्यक्रम किंवा सण उत्सवामध्ये अनेकदा रसगुल्ल्याचा समावेश करण्यात येतो. याचं खरं नाव खीरा मोहन असं आहे. असं म्हटलं जातं की, याची सुरुवात ओदीशामध्ये करण्यात आली होती. या पदार्थामागेही अनेकदा एक गोष्ट सांगण्यात येते. असं म्हटलं जातं की, एकदा भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी जात असताना आपल्यासोबत पत्नी लक्ष्मीला घेऊन गेले नाहीत. त्यामुळे लक्ष्मी रूसून बसली होती. आपल्या पत्नीची समजूत काढण्यासाठी तिला रसगुल्ला खाऊ घातला होता. त्यामुळे नवव्या दिवशी रसगुल्ल्याचा नैवद्य दाखवण्यात येतो.
लाडू
लाडू म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो बुंदीचा लाडू असो किंवा इतर कोणताही. महराष्ट्रात तर हा पदार्थ सर्वांच्याच घरी तयार करण्यात येतो. सणांच्या दिवशी किंवा एखाद्या खास समारंभाच्या दिवशी लाडू नक्की बनवण्यात येतात. पण लाडूंचा इतिहासही फार वेगळा आहे. आधी आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा महिलांच्या गरोदरपणात त्यांना पौष्टीक तत्व मिळावीत यासाठी खास लाडू तयार केले जात असत. आजही डिंकाचा लाडू, सुंठाचा लाडू तयार करण्यात येतात.
संदेश
संदेश बंगालची एक खास मिठाई आहे. नासलेल्या दूधापासून पनीर सारखा एक पदार्थ तयार करण्यात येतो त्यापासून ही मिठाई तयार करण्यात येते. फक्त हा पदार्थ पनीरपेक्षा फार मुलायम असतो. असं म्हटलं जातं की, हा पदार्थ सर्वात आधी पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आला होता. रसगुल्ल्याच्या आधीपासून संदेश पदार्थ बंगालमध्ये लोकप्रिय आहे. आधीच्या काळात नासलेलं दूध वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये साखर टाकून खाल्लं जात असे. तेव्हापासूनच संदेश या पदार्थ तयार करण्यास सुरुवात झाली.