आपण जे खातो, ते खरंच हेल्दी आहे का?
By admin | Published: June 9, 2017 07:22 PM2017-06-09T19:22:22+5:302017-06-09T19:22:22+5:30
महागडं, नवीन, फॅशनेबल असं आपण जे खातो, ते खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे का?
- कृष्णा पाठक
फॅशन कसलीही येवू शकते. आपण फार मॉर्डन, आधुनिक आहोत असं कशानंही वाटू शकतं. त्यात फॅड तर काय कसलंही येतंच. सध्या अशी फूड फॅडस चर्चेत आहेत. जाहिरातींचा भडीमार आहेत. माध्यमं आपल्याला सांगत असतातच की अमूक सेलिब्रिटी तमूक खातात, ढमूक तर काय फमूक खातात म्हणून फीट आहेत. मग आपल्यालाही वाटतं की, आपण ते खावं. कारण ते खाणंही हे जास्त ट्रेण्डी आहे. मॉडर्न आहे. महागडं असलं तरी काय झालं ते आपल्याला फीट ठेवू शकतं. मग आपण जास्त पैसे खर्च करतो आणि ती जाहिरातीत दिसणारी प्रॉडक्ट्स आणतो. ते खातो. त्यातून खरंच आपल्याला काही मिळतं का?
याचं उत्तर शोधायला हवं.
ते शोधत गेलं तर कळेल की जे आपण पूर्र्वी कधीही खात नव्हतो ते खाणं हे काही आपल्या पचनसंस्थेला झेपत नाही. जे आपले वाडवडील खात होते, पिकवत होते ते खावं. जास्त दूर पिकणारं अन्न खावू नये असं आता अनेक आहारतज्ज्ञ सांगत आहेत.
तरीही लोक खातात. त्यांना प्रश्न पडतात की काय खावं?
त्यातलेच हे काही चर्चेतले प्रश्न..
व्हीट ब्रेड खावू की साधा?
उत्तर आहे पोळी खा. दोन्ही खावू नका. ब्रेड खाण्यापेक्षा आपली पोळी, नागलीची,तांदुळाची, ज्वारी, बाजरीची तूप-तेल लावलेली भाकरी खाणं उत्तम.
ओट्स की कॉर्नफ्लेक्स?
त्याचं उत्तर आहे, पोहे, सांजा, थालीपीठ, घावन, धिरडी, फोडणीचा भात. जे आपले पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ आहेत ते खा, हे असे फॉरीनर नाश्ते नकोत.
तेल कुठलं वापरू?
राईस ब्रॅन, आॅलिव्ह, सरसो हे तेल नको, त्यापेक्षा करडई, भूइमूग, सूर्यफूल ही आपली पारंपरिक तेल वापरणं उत्तम. तेलापेक्षा घरच साजूक तूप खा, भरपूर खा.