चवीला राजी, फणसाची भाजी; वटपौर्णिमेला खास रेसिपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 04:44 PM2019-06-15T16:44:24+5:302019-06-15T16:54:08+5:30
सध्या बाजारात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. अशातच फणसांचे गरे खाण्याची गंमत काही औरच... याशिवाय फणसाचं आइस्क्रिम, वेफर्स, फणसपोळी यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. पण यासर्वांपेक्षा फणसाच्या भाजी खाण्याची बातच न्यारी...
सध्या बाजारात फणस मोठ्या प्रमाणात मिळतात. अशातच फणसांचे गरे खाण्याची गंमत काही औरच... याशिवाय फणसाचं आइस्क्रिम, वेफर्स, फणसपोळी यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यात येतात. पण यासर्वांपेक्षा फणसाच्या भाजी खाण्याची बातच न्यारी... आज आम्ही तुम्हाला फणसाच्या भाजीची रेसिपी सांगणार आहोत. खरं तर फणसाची भाजी वेगवेगळ्या पद्धतींनी तयार केली जाते. पण कोणत्याही पद्धतीने केली तरिही फणसाची भाजी म्हटलं की, एक फक्कड बेतच असतो. जाणून घेऊया भाजी तयार करण्याची सोपी पद्धत...
फणसाची भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- कच्च्या फणसाचे गरे
- फणसाच्या बिया
- ओलं खोबरं
- सुकलेल्या लाल मिरच्या
- लसणाच्या पाकळ्या
- हळद
- तेल
- धणे
- कोथिंबीर
- मीठ चविनुसार
फणसाची भाजी तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी कच्च्या फणसाचे गरे आणि बिया स्वच्छ करून त्याचे लहान काप करून घ्यावेत.
- गॅसवर एका भांड्यामध्ये गऱ्यांचे काप आणि हळद टाकून मंद आचेवर वाफवून घ्यावे.
- दुसऱ्या एका भांड्यात पाणी घेऊन त्याव फणसाच्या बिया उकडून घ्याव्यात.
- दोन्ही गोष्टी शिजल्यानंतर एकत्र करून मिश्रण थंड करत ठेवावे.
- एक भांड घेऊन त्यामध्ये तेल गरम करत ठेवावे.
- तेल गरम झाल्यानंतर लसूण, धणे आणि लाल मिरच्यांचे तुकडे टाकून फोडणी तयार करावी.
- फोडणी तडतडल्यावर गॅस बंद करून फोडणी बारिक करावी. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बारिक करून शकता. त्यासाठी तुम्ही खलबत्ता किंवा मिक्सरचाही वापर करू शकता.
- फोडणी थंड झाल्यावर गऱ्याच्या मिश्रणावर ओतावी आणि मंद आचेवर सर्व मिश्रण एकत्र करून एक वाफ घ्यावी. वरून चवीनुसार मीठ एकत्र करावे.
- गार्निशिंगसाठी ओलं खोबरं आणि कोथिंबिर टाकून भाजी सर्व्ह करावी.