हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतो गुळाचा चहा; असा करा तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:46 PM2018-12-12T16:46:18+5:302018-12-12T16:49:25+5:30
हिवाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा वाढू लागला आहे. अशातच बदलेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो.
हिवाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणात गारवा वाढू लागला आहे. अशातच बदलेल्या आणि थंड वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणावर असते. अस्थमा, ब्रोंकायटिस आणि एलर्जी संबंधित आजारांवर गुळाच्या चहाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त गुळ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तम ठरतो. तज्ज्ञांच्या मते, एक व्यक्ती दररोज 5 ते 6 ग्रॅम गुळ खाऊ शकते. जाणून घेऊया हिवाळ्यामध्ये गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि कसा तयार कराव हा आरोग्यदायी चहा त्याबाबत...
गुळाचा चहा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- दूध 1 कप
- पाणी 1 कप
- चहा पावडर 1 छोटा चमचा
- गुळ 3 छोटे चमचे
- छोटी वेलची 2
- आलं 1 छोटा चमचा
- तुळशीची पानं 3 ते 4
गुळापासून चहा तयार करण्याची कृती :
- सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्या.
- उकळलेल्या पाण्यामध्ये चहा पावडर, आलं, वेलची, तुळशीची पानं आणि गुळ एकत्र करा.
- मिश्रण उकळल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून पॅनवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- असं केल्याने सर्व मसाले व्यवस्थित चहामध्ये एकत्र होतील.
- दुसऱ्या एका पातेल्यामध्ये दूध उकळून घ्या.
- दूध उकळ्यानंतर दोन्ही गॅस बंद करा आणि हे दूध चहामध्ये हळूहळू मिक्स करा.
- लक्षात ठेवा एकत्र ओतल्यामुळे दूध फाटतं, म्हणून हळूहळू हे एकत्र करा.
गुळाचा चहा पिण्याचे शरीराला होणारे फायदे :
ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी गुळ
गोड पदार्थांमध्ये आरोग्यदायी ठरणाऱ्या गुळाचे शरीराला अनेक फायदे होतात. गुळाचं नियमितपणे सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी गुळ हा रामबाण उपाय ठरतो. डॉक्टरही हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रूग्णांना गुळाचं सेवन करण्याचा सल्ला देतात.
पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी
गुळ पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतं. यामध्ये ऊसाचा रसामधील पोषक तत्व असतात. पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी गुळ फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर जेवल्यानंतर गुळ खाल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी
गुळ आरोग्यासाठी चांगला समजला जातो. वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गुळाचं सेवन करा. गुळ शरीरातील वॉटर रिटेंशन कंट्रोलमध्ये ठेवतं आणि वजन नियंत्रणात राहतं.