वजन कमी करायचय मग वजन कमी करणारे ज्युसेस प्या.
By madhuri.pethkar | Published: November 24, 2017 03:51 PM2017-11-24T15:51:39+5:302017-11-24T16:00:16+5:30
वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात काही फळं आणि भाज्यांचं ज्यूस घ्यायला हवं. या ज्युसेसमुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात, नको ते सटरफटर खाण्याची इच्छा होत नाही, पचनक्रिया सुधारते.आणि याचा परिणाम वजनावरही दिसतोच. वजन कमी करणारे ज्युसेस अशीच यांची ओळख आहे. वजन कमी करायचं असेल तर अप्रिय प्रकार करण्यापेक्षा काही गोष्टी आवडीनं केल्या तर चांगला परिणाम दिसतो.
- माधुरी पेठकर
वजन कमी करण्याचा निश्चय अनेकजण अनेकवेळा करतात. या निश्चयासाठी डाएट, व्यायाम, जिम, योगा यासारखे अनेक पर्याय ट्राय केले जातात. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे कोणताही पर्याय फक्त काही दिवस फॉलो केला जातो. नंतर मात्र हा पर्याय फॉलो न करता येण्याची असंख्य कारणं दिली जातात. त्यामुळे होतं काय की अनेक गोष्टी करूनही वजन काही कमी होत नाही.
खरंतर रोजच्या आहारात थोडा बदल केला, काही महत्त्वाच्या गोष्टी त्यात समाविष्ट केल्या तर व्यवस्थित खाऊन पिऊनही वजन कमी करता येतं. योग्य डाएट हा वजन कमी करण्याचा सोपा उपाय असतो.
पण डाएट म्हटलं की ताटातल्या पदार्थांना कात्री लावायची. आवडीचे पदार्थ सोडून देवून नावडतीचे पदार्थ नाखुषीनं खायचे असे प्रयोग केले जातात. पण अशा डाएटमुळे वजनामध्ये काही ग्रॅमने सुध्दा परिणाम दिसत नाही. नेहेमीच्या जेवण, नाश्त्यातून पदार्थांना हद्दपार करण्यापेक्षा त्यात वजन घटवण्यासाठी उपयुक्त असे अन्नपदार्थ समाविष्ट करणं जास्त योग्य.
वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात काही फळं आणि भाज्यांचं ज्यूस घ्यायला हवं. या ज्युसेसमुळे शरीराला आवश्यक ते घटक मिळतात, नको ते सटरफटर खाण्याची इच्छा होत नाही, पचनक्रिया सुधारते.आणि याचा परिणाम वजनावरही दिसतोच. वजन कमी करणारे ज्युसेस अशीच यांची ओळख आहे. वजन कमी करायचं असेल तर अप्रिय प्रकार करण्यापेक्षा काही गोष्टी आवडीनं केल्या तर चांगला परिणाम दिसतो.
वजन कमी करणारे ज्यूस
1) गाजराचा ज्यूस
सध्या बाजारात मस्त लाल लाल गाजर मिळता आहेत.संपूर्ण थंडीमध्ये गाजराचं ज्यूस प्यायला काहीच हरकत नाही. वजन कमी करण्यात गाजराचं ज्यूस खूप फायदेशीर ठरतं. एकतर यात कॅलरीज एकदम कमी आणि फायफर खूप जास्त असतात, नाश्त्याच्या वेळेस एक मोठा ग्लास गाजराचं ज्यूस प्यायलं की जेवणापर्यंत पोटात भूक जाणवत नाही. त्यामुळे सतत भूक भूक होवून काही बाही खाल्लं जात नाही. गाजर हे शिजवून, उकडून खाण्यापेक्षा कच्चं खाणं जास्त चांगलं. यासाठी गाजराचा ज्यूस घेणं उत्तम पर्याय आहे. गाजराच्या ज्यूसमुळे पित्त कमी करणारं अॅसिड जास्त स्रवतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळेही वजन कमी होतं. गाजराचं ज्यूस चवदार करायचं असेल तर त्यात सफरचंद घालावं. संत्र्याच्या सिझनमध्ये अर्ध संत्र घालावं. आलं किसून घालावं. या ज्यूसमुळे चांगलं डिटॉक्सिकेशनही होतं.
2) कारल्याचा ज्यूस
कारल्याचा ज्यूस हे ऐकायला जरा कसंसच होतं. पण वजन कमी करण्यासाठी हे ज्यूस एकदम परिणामकारक आहे. नियमितपणे कारल्याचा ज्यूस घेतल्यास पचनक्रिया सुधारणारं बाइल अॅसिड जास्त प्रमाणात स्त्रवतं. शिवाय कारल्यामध्ये कॅलरीजही कमी असतात.मात्र हा ज्यूस पिण्याआधी वैद्यांचा सल्ला घ्यावा. आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणानुसार प्यावा.
3) काकडी ज्यूस
ज्या फळांमध्ये पाणी जास्त त्यात कॅलरीज कमी असं हे सोपं गणित आहे. वजन कमी करायचं असेल तर लो कॅलरीज असलेलं डाएट करावं किंवा कॅलरीज बर्न करणारे घटक सेवन करावेत. दुसरा उपाय जास्त चांगला. काकडीचं ज्यूस हे म्हणूनच सेवन करावं. एकतर काकडीत पाणी खूप आणि फायबरही जास्त. काकडीचं ज्यूस प्यायल्यानं पोट भरलेलं राहातं. काकडीच्या ज्यूसमध्ये थोडा लिंबाचा रस, पुदिन्याची पानं वाटून घालावीत. उन्हाळ्यात असं काकडीचं ज्यूस ताजतवानं करतं.
4) आवळा ज्यूस
दिवसाची सुरूवात आवळ्याचा रस पिऊन करणं हे उत्तम आहे. त्यामुळे दिवसभर आपली पचनक्रिया ताळ्यावर राहाते. अतिरिक्त चरबी जळून जाते. वजन कमी करण्यासाठी आवळा ज्यूस पिणार असेल तर तो सकाळी रिकाम्यापोटी प्यायला हवा. दिवसभर ताजंतवानं राहाण्यासाठी आवळा ज्यूसमध्ये थोडं मध घालावं. हे ज्यूस उन्हाळ्यातही उत्तम असतं.
5) डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबाचा रस त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतो. डाळिंबाच्या रसानं चेहे-यावर तजेला येतो. डाळिंबाच्या रसानं वजनही कमी होतं. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये अॅण्टिआॅक्सिडण्टस, पॉलिफिनॉल हे महत्त्वाचे घ्टक असतात. डाळिबाच्या रसाच्या नियमित सेवनानं चरबी जळते. पचनक्रिया सुधारते. भूकेची भावना सकारात्मरित्या शमवण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस खूप मदत करतं.
6) कोबीचा ज्यूस
पोट सतत फुगल्यासारखं वाटत असेल, सतत अपचन होत असेल तर कोबीचं ज्यूस अवश्य घ्यावं. कोबीच्या ज्यूसमुळे पचनमार्ग मोकळा होतो. शरीरातील विषारी घटक पटकन बाहेर पडतात. कोबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. वजन कमी करण्याचा सल्ला देताना अनेक तज्ञ्ज्ञ कोबीसारख्या भाजीचा पर्याय समोर ठेवतात. हाय फायबर असलेले अन्नघटक पोटात गेल्यास ते शरीरातील जास्तीचं पाणी शोषून घेतात. ते पाणी घट्ट जेलस्वरूपात तयार होतं. हे जेल अन्न खाल्ल्यानंतर हळू हळू पचनक्रिया करतं. यामुळे पटकन भूक लागत नाही. कोबीचा ज्यूस बनवताना त्यात सफरचंद, लिंबू, गाजर किंवा बीट हे आवडीप्रमाणं घालता येतं.
7) कलिंगड ज्यूस
रसदार असलेली फळं हे 100 ग्रॅममधून फक्त कॅलरीज शरीरास देतात. आणि पाणीदार फळं खाल्ली की दिवसभर शरीरात शुष्कता जाणवत नाही. कलिंगडाच्या रसात असलेल्या अॅसिडमुळे शरीरातील फॅट जळण्यास मद्त होते. कलिंगड हे उन्हाळ्यात मिळतात तेव्हा वजन कमी करण्याचा उपाय म्हणून उन्हाळ्यात कलिंगडचं ज्यूस नियमित प्यावं.
8) संत्र्याचा ज्यूस
ताज्या संत्र्याचा रस आरोग्यदायी असतो. इतर सर्व थंडपेयांपेक्ष संत्रीचा ज्यूस उत्तम असतो. कारण यात कॅलरीज कमी असतात.
9) अननस ज्यूस
पोटाचा घेर वाढलेला असेल तर त्यावर अननसाचा ज्यूस उत्तम पर्याय आहे. अननसात ब्रोमलेन नावाचं उपयुक्त विकर असतं जे अन्नघटकातील प्रथिनांचं पचन करायला मदत करतं. शिवाय पोटावरची चरबी जाळतं.
10) दूधी भोपळ्याचा ज्यूस
दूधी भोपळा आरोग्यास उत्तम मानला जातो. आयुर्वेदात चरबी कमी करण्याचा नैसर्गिक उपाय म्हणून दूधी भोपळ्याकडे बघितलं जातं. दुधी भोपळ्यात कमी कॅलरीज असतात, ते शरीरातील अतिरिक्त चरबी जाळतात शिवाय शरीराला थंड ठेवण्यात भोपळा महत्त्वाची भूमिका बजावतो.