फक्त दूध प्याल्यानेच ताकद येते, असं म्हणता? -मग तुमचे गैरसमज दूर करुन घ्या..
By admin | Published: June 9, 2017 07:15 PM2017-06-09T19:15:03+5:302017-06-09T19:15:03+5:30
दूध प्यावं म्हणून मुलांच्या मागे लागतो आपण, पण खरंच त्यानं सगळे फायदे मिळतात का?
- पवित्रा कस्तुरे
दूध पिण्यावरुन घरोघर वाद असतात. काही घरी मुलं दूध पीत नाहीत यावरुन युद्धच होताच. दूध पिणं हा प्रतिष्ठेचा विषय होतो. मात्र खरंच दूध पोषक असतं का? दुधाविषयी आपले काही गैरसमज असतात का? असतील तर ते वेळीच दूर केलेले बरे.
दूध म्हणजे पुर्णान्न?
दूध हे अत्यंत उत्तम पोषणमूल्य असलेलं अन्न आहे. प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, बी ट्वेल यासह अनेकगोष्टी दुधातून मिळतात. पण त्यात व्हिटॅमिन सी आणि लोह नाही. त्यामुळे जेवलं नाही, चौरस आहार नाही आणि आपण नुस्तं दूध पितोय म्हणते भागलं असा विचार करु नये. पोटभर न जेवणारी, फक्त दूध पिणारी मुलं अशक्त राहू शकतात.
नाश्ता कशाला? ग्लासभर दूध पुरे
हा असाच एक गैरसमज. काहीजण नाश्ता करत नाहीत. फक्त ग्लासभर दूध पितात. ते चूक आहे. पण नाश्ता केला पाहिजे, त्यात किमान ४० % कार्बोहायड्रेडस पाहिजे. म्हणजे आपले पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ उत्तम. सकाळी शरीराला, मेंदुला ग्लुकोजची गरज असते. ती नुस्त्या दुधानं भागत नाही.
दुधातून कॅल्शिअम मिळतं?
मिळतं. पण फक्त दुधातूनच मिळत नाही. तीळ, नाचणी, राजमा, राजगीरा, सोयाबीन यापदार्थातून जास्त कॅल्शिअम मिळतं. त्यांचाही आहारात समावेश करावा.
दूध सगळ्यांनीच प्यावं?
वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत दूध आहारात असणं उत्तम. त्याची गरज असते. शरीराची गरज भागते. मात्र त्यानंतरच्या वयात आपण चौरस आहार घेत असूू, कॅल्शिअम देणारे घटक आहारात असतील तर दूध प्यायलाच हवं असं नाही.
दुधानं गॅस होतात?
काहीजणांना होतात? गॅसेस होतात. दूध पचत नाही. मात्र त्यांना पचनाचे अन्य विकारही असतात. एकट्या दुधाला दोष देवू नये.
बाळाला वरचं दूध द्यावंच?
१ वर्षापर्यंत बाळाला शक्यतो गायीचं, म्हशीचं दूध देवू नये. आईचं दूध उत्तम. ते नसेल तर फॉर्म्युला दूध द्यावं. अन्य नाही.