उन्हाळ्यात फळांचा राजा ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कसा ते वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:38 PM2019-04-11T12:38:39+5:302019-04-11T12:43:56+5:30
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांच्या राजाच्या आगमनाचे. आंब्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. घरात तर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू होते.
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते फळांच्या राजाच्या आगमनाचे. आंब्याचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. घरात तर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. आंबा तर आपल्याला सर्वांनाच आवडतो. लहानांपासून थोरामोठयांपर्यंत सर्वच आंब्याच आतुरतेने वाट पाहात असतात. आंबा जेवढा स्वादिष्ट असतो, तेवढाच तो त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उपयोगी ठरतो. आंबा कच्चा असो किंवा पिकलेला, शरीरासाठी फायदेशीरचं ठरतो. उन्हाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून बचाव करण्यासाठी आंबा मदत करतो. जाणून घेऊया आंब्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
आंब्याचे शरीरासाठी असणारे फायदे :
1. पोटाच्या समस्यांपासून बचाव
उन्हाळ्यामध्ये पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आंबा या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला मदत करतो. कच्चा आंबा म्हणजेच, कैरी आतड्यांमध्ये होणारं संक्रमण दूर करण्यासाठी मदत करते. याव्यतिरिक्त आपचन आणि बद्धकोष्ट यांसारख्या समस्यांवरही आंबा गुणकारी ठरतो. कैरीच्या सेवनाने लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
2. अॅसिडिटीपासून सुटका
धकाधकीची जीवनशैली आणि अवेळी खाणं यांमुळे अनेकांना अॅसिडिटीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये अनेकदा अॅसिडिटीचा त्रास सहन करावा लागतो. अशातच कैरीच्या सेवनाने अॅसिडीटी दूर होण्यास मदत होते. तसेच गॅस आणि बद्धकोष्टही दूर होतं.
3. सन स्ट्रोकपासून बचाव
उन्हाळ्यामध्ये अनेकदा बाहेर राहिल्याने सनस्ट्रोकचा त्रास सहन करावा लागतो. सन स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी कैरी अत्यंत फायदेशीर ठरते. याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शरीराला जाणवणारी पाण्याची कमतरता भरून काढण्याचं काम कैरी करते.
4. ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी मदत
कैरीमध्ये आढळून येणारं व्हिटॅमिन सी ब्लड सेल्स लवचिक करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहण्यासाठी मदत करतं. याव्यतरिक्त शरीरामध्ये रक्ताची पातळी वाढविण्यासाठीही कैरी मदत करते.
5. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
शरीरामध्ये होणाऱ्या आजारांपासून लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती अत्यंत आवश्यक असते. कच्चा आंबा आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
6. उलट्या होणं किंवा अस्वस्थ वाटणं
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील वाढलेल्या उकाड्यामुळे उलट्या होणं किंवा अस्वस्थ वाटणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच काळ्या मीठासोबत आंब्याचं किंवा कैरीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
7. बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण
शरीरामध्ये आढळून येणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्याचं काम आंबा करतो. बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रीत ठेवल्याने हृदयाच्या आजारांपासून रक्षण होतं. याव्यतिरिक्त लठ्ठपणा आणि वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आंबा मदत करतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.