फायदे वाचून रोज खाल इडली ढोकळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:10 PM2018-10-31T16:10:46+5:302018-10-31T16:14:48+5:30
आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात.
आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात. आज जाणून घेऊयात अशा रिजनल पदार्थांबाबत जे स्वादिष्ट आहेतच परंतु फिटनेससाठीही ते फायदेशीर ठरतात. लो कॅलरी असलेल्या या पदार्थांना तुम्ही तुमच्या विकली मेन्यूमध्येही समाविष्ट करू शकता.
मऊ आणि लूसलूशीत इडली खाण्याचे फायदे
सकाळचा नाश्ता असो किंवा मधल्या वेळीची भूक भागवणं. वाफळतं सांबर आणि फोडणी दिलेली खोबऱ्याची चटणीसोबत खाण्यात येणारी इडली प्रत्येकालाच आवडते. प्रामुख्याने दक्षिण भारतातील असलेला हा पदार्थ अगदी परदेशातही चवीने खाण्यात येतो. इडली तयार करण्यासाठी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा वापर करण्यात येतो. यामुळे यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात. तर फॅट्स फार कमी असतात. त्यामुळे पचण्यास फार हलकी असते. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इडली खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं. इडलीमध्ये फार कमी प्रमाणात सोडिअम असतं. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासही हा उत्तम पर्याय आहे. याव्यतिरिक्त इडलीमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फोलेट अॅसिड, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी देखील असतं.
गुजरातची शान म्हणून ओळखला जाणारा खमंग ढोकळा
ढोकळा गुजरातमध्ये लोकप्रिय आहेच पण त्याचबरोबर आता हा संपूर्ण देशभरात मिळणारा पदार्थ आहे. ढोकळा सहज कुठल्याही प्रांतात सहज उपलब्ध होतो. एवढंच नव्हे तर विदेशातील अनेक रेस्टॉरंट्सच्या मेन्यूमध्ये ढोकळ्याचा समावेश आवर्जून करण्यात येतो. सर्वांना आवडणारा हा ढोकळा डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर असतो. ढोकळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फार कमी कॅलरीज असतात. 100 ग्रॅम ढोकळ्यामध्ये फक्त 160 कॅलरी असतात. यामध्ये बेसन म्हणजेच चण्याच्या पिठाचा समावेश असल्यामुळे यातील पोषक तत्व आणखी वाढतात. यामध्ये चण्याच्या डाळीचं पिठ असल्यामुळे फायबर आणि प्रोटीन्स मुबलक प्रमाणात असतात. ढोकळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतं, त्यामुळे डायबिटीजच्या रूग्णांसाठी हा पदार्थ फायदेशीर ठरतो.