Til Ladu Recipe : मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे लाडू, एकदा खाल खातच रहाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 17:15 IST2020-01-09T17:11:31+5:302020-01-09T17:15:26+5:30
Til Ladu Recipe : नवीन वर्षाचा पहिला सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Til Ladu Recipe : मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे लाडू, एकदा खाल खातच रहाल...
नवीन वर्षाचा पहिला सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळ्यांच्या घरात विचार चालला आहे की या वर्षी मकरसंक्रात कशी साजरी करायची. पण आपण कितीही नाविन्यपूर्ण पध्दतीने सण साजरा करण्याचं ठरवलं तरी खाद्यसंस्कृती मात्र वर्षानुवर्ष तशीच राहत असते. मकरसंक्रातीनिमित्त जर तुम्हीसुध्दा तिळाचे लाडू तयार करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला तिळाच्या लाडूंची खास रेसेपी सांगणार आहोत. या पध्दतीने जर तुम्ही लाडू बनवाल तर घरातील सगळी मंडळी तुमच्यावर खूश झाल्याशिवाय राहणार नाही.
अनेकदा तिळाचे लाडू तयार करत असताना कडक होतात तसंच गुळाचं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे जास्त गोड होतात. त्यामुळे तुमचे दात दुखण्याचा धोका असतो. असं होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला तिळाच्या लाडूंची मस्त परफेक्ट रेसीपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तिळाच्या लाडूंची साहीत्य आणि कृती.
(image credit- lazy2cook)
साहित्य-
१/२ किलो तिळ, १/२ किलो चिकीचा गूळ, १ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट,१ वाटी किसून भाजलेले सुकं खोबरं, १/२ वाटी चण्याचं डाळं, १ चमचा वेलची पूड, १ ते २ चमचे तूप.
कृती
तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. गॅसवर एक भांडे ठेवावे त्या भांड्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.