मणिपूरच्या आजीबाईंचा ‘केली चना’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 08:28 AM2023-12-22T08:28:01+5:302023-12-22T08:28:14+5:30
ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दल असा समज आहे की, इथे शाकाहारी खाणे कमी असते किंवा विचित्र पदार्थ असतात. तर तसे नाही.
स्ट्रीट फूड म्हणजे रस्ता खाणे म्हणताना आपण प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश अशी राज्य बघतो. तुलनेत उत्तर पूर्व भारतातील खाणे तसे विचारात घेतले जात नाही! त्यामुळे आज बघुया मणिपूरमधील तुफान लोकप्रिय रस्ता खाणे : केली चना.
ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दल असा समज आहे की, इथे शाकाहारी खाणे कमी असते किंवा विचित्र पदार्थ असतात. तर तसे नाही. या राज्यांमधील खाणे पर्यावरण, ऋतू यानुसार स्थानिक घटक पदार्थ घेऊन तयार होते.त्यामध्ये मांसाहारी पदार्थांइतकेच शाकाहारी पदार्थांचेदेखील वैविध्य आहे.
केली चना हा त्यातलाच एक चटपटीत पदार्थ. केली चनामध्ये वापरले जाणारे चणे म्हणजे काबुली किंवा काळे. अन्यत्र मिळते तशी ही चना चाट नाही तर मस्त तिखट अशी सुकी भाजी आणि मणिपूरमधील रस्ता खाण्यात हा पदार्थ अव्वल. उकडलेले चणे राईच्या तेलात कांदा, टोमॅटो, आले, लसूण, काही स्थानिक मसाले, तिखट यांच्या फोडणीत परतले जातात आणि वरून काळ्या तिळाची पूड अथवा अख्खे तीळ, कोथिंबीर, कांदापात घालून देतात. हवे तर वरून लिंबू पिळायचे! चव अफलातून असते. या भागातल्या काही मिरच्या जहाल तिखट त्यामुळे हवे असल्यास त्याचे वाटणही दिले जाते; अर्थात तो जाळ खायला जिगरा हवा!!
याच्यासोबत काहीही नसते. ब्रेड किंवा पुरी असे काहीही नाही आणि केली चना थोडा ओलसर असतो. सर्व फस्त झाले की द्रोणात, वाडग्यात जे पाणी उरते ते भुरकून प्यायचे की झाले.
आता याला केली नाव का? - तर लोककथा अशी आहे की, केली नावाची म्हातारी एका झाडाखाली बसून चणे विकायची. लोकांचा समज होता की म्हातारी चण्यात काहीतरी गुंगीचा पदार्थ मिसळून देते. खूप प्रसिद्ध झाली. लोकांनी अनेकदा विचारलं तरी तिने कृती सांगितली नाही आणि केली चना या भागातल्या चवीचा अविभाज्य भाग झाला. जशी दौलत की चाट, मामा काणेंचा बटाटावडा, टूडे के कबाब तसा हा केली चना.
हा चना फस्त करून वरून कडक चहा मारायचा. तिखट पदार्थ खाल्ला आणि वरून गरम पेय घेतले की वेगळी अनुभूती येते... ती हीच!
- शुभा प्रभू साटम, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक shubhaprabhusatam@gmail.com