माझी खाद्ययात्रा: तुमकुर इडली... एक वडा-सांबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:02 AM2022-08-21T07:02:07+5:302022-08-21T07:03:16+5:30
‘संजय उवाच’ नावाचा एकपात्री कार्यक्रम मी करू लागलो त्या काळात... साधारण २००४ च्या सुमारास. कारण? विनाकारण; पण तरीही एक कारण होतं.
संजय मोने, अभिनेते
‘संजय उवाच’ नावाचा एकपात्री कार्यक्रम मी करू लागलो त्या काळात... साधारण २००४ च्या सुमारास. कारण? विनाकारण; पण तरीही एक कारण होतं. माझ्या भाचीच्या बंगळुरू महाराष्ट्र मंडळात एक कार्यक्रम करायचं मी ठरवलं. तिला सगळी रूपरेखा किंवा रूपरेषा कळवली. तिने होकार दिला. कार्यक्रमाची परवानगी घ्यायला लेखकाकडे गेलो. त्याने तिप्पट पैसे मागितले. देणं शक्य नव्हतं. आता काय करायचं? नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्याला गेलो होतो. सुधीर गाडगीळ भेटला. ‘काय रे? काय झालं? नेहमीसारखा टर्रेबाजी करत नाहीयेस?’ मी त्याला घडलेला सगळा किस्सा सांगितला.
‘इतकंच?’
सुधीरसाठी अशक्य असं काहीच नसतं. ‘इतकी वर्षं या व्यवसायात आहेस. बऱ्याच गोष्टी असतील की साचलेल्या, त्यांना एकत्र कर. जोडीने तुझे आवडते असे काही नाट्यप्रवेश असतील ना? ते सादर कर. शिवाय इतक्या वर्षांतले तुझे काही आडाखे असतील, ते नव्या पिढीसाठी सांग. दोन तासांचा कार्यक्रम होईल. दोन टप्पे पाड. एकानंतर मध्यंतर घे. झाला कार्यक्रम. शेवटच्या पंधरा मिनिटांत प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दे. अडीच तास होईल. इतकं पुरेसं आहे. जा, प्रयोग कर आणि भाचीला हो म्हणून सांग.’
त्याच्या दृष्टीने विषय संपला होता. माझ्या दृष्टीने सुरुवातही झाली नव्हती. मी परत आलो मुंबईला. बंगळुरूला पोहोचलो. आगतस्वागत झालं. मी त्यांना स्वच्छपणे सांगितलं, ठरवलेला कार्यक्रम होऊ शकत नाहीये; पण माझ्या मनात दुसरा एक आहे, तो मी आता तुम्हाला या माझ्या हॉटेलच्या खोलीत करून दाखवतो आणि तुम्ही ठरवा. आवडलं नाही तर माफी मागून मोकळा होईन. मी बोलत गेलो आणि त्यांना बहुतेक आवडला असावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलत गेलो, बोलत गेलो आणि सव्वातीन तास कार्यक्रम झाला. टाळ्यांचा कडकडाट..
सगळी मंडळी खुश. त्याहीपेक्षा मी. माझ्या भाचीने मला सांगितलं, ‘आमच्या मंडळातल्या लोकांना मी सांगितलंय, तो आपल्याबरोबर जेवायला येईलच असं नाही, बरोबर ना?’ मला फार कौतुक वाटलं तिचं. वाट फुटेल तिथे फिरत राहिलो. तिथेच एका लहानशा कोपऱ्यात बशीएवढी इडली खाल्ली, तुमकुर इडली. पांढरीशुभ्र. वर लाल रंगाची पावडर आणि पांढराशुभ्र लोण्याचा गोळा. दोन खाल्ल्या आणि लाज वाटून थांबलो. नंतर एक वडा-सांबार. खरं सांबार म्हणजे काय? तर ते. आपण घरी जरा वेगळी आमटी सांबार म्हणून खपवतो. डोसा मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तो मैसोर डोसा कुठेही मिळाला नाही. नाही तरी बनारसला तरी मुंबईइतकं चांगलं बनारसी पान कुठं मिळतं?