Navratri 2019 : उपवासही वाटेल हवाहवासा; 'या' क्लासी रेसिपी करा ट्राय!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 05:47 PM2019-09-25T17:47:15+5:302019-09-25T17:47:53+5:30
काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून सगळीकडे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. अशा लोकांच्या मनात असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं?
काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून सगळीकडे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. अशा लोकांच्या मनात असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं?
या दिवसांमध्ये अनेक पदार्थांचं सेवन केलं जातं. परंतु सर्वच गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने ठिक नसतात. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत जे उपवासालाही चालतात आणि तुम्हाला उपवासा दरम्यान वेगळं खाल्याचा आनंदही देतात.
जाणून घेऊयात अशा रेसिपींबाबत ज्या फार सोप्या आहेतच पण त्याचबरोबर आरोग्यदायी देखील आहेत.
1. साबूदाण्याचे थालीपीठ
जर तुम्हाल साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही थोडं वेगळा पदार्थ म्हणून साबूदाण्याचं थालीपीठ ट्राय करू शकता. तुम्ही यामध्ये साबुदाण्यांसोबतच उकडलेला बटाटा, शेंगदाणे आणि सैंधव मीठ घालून तयार करू शकता.
2. रताळ्याचा हलवा
उपवासामध्ये खाण्यात येणारे सर्वात मुख्य कंद म्हणजे रताळी. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रताळ्यांचं सेवन करण्यात येतं. उपवासाला याचा हलवा तयार करून खाण्यात येतो. त्यासाठी रताळी उकडून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये थोडं तूप टाकून, त्यामध्ये उकडलेली रताळी टाकून परतून घ्या. थोड्या वेळाने त्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रुट्स टाकून एकत्र करा. रताळ्याचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.
3. तिळाची खीर
नवरात्रीच्या उपवासासाठी तिळाची खीर खाणं फायदेशीर ठरतं. ही खीर तयार करण्यासाठी दूध उकळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडं कच्चं दूध आणि भाजलेले तीळ एकत्र करा आणि शिजवून घ्या. त्यानंतर मिश्रणामध्ये किसलेलं ओलं खोबरं टाकून पुन्हा थोडा वेळ शिजवून घ्या. त्यानंतर खीर गॅसवरून उतरवून वरून ड्रायफ्रुट्स टाका. खीर खाण्यासाठी तयार आहे.
4. शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या
या तयार करण्यासाठी शिंगाड्याच्या पिठामध्ये बटाटा कुसकरून टाका. त्यानंतर जिऱ्याची पावडर, हिरव्या मिरच्या, थोडं तेल आणि सैंधव मीठ एकत्र करून घ्या. हे पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि त्याच्या पुऱ्या तयार करा. या पुऱ्या तुम्ही तूपात किंवा तेलात तळू शकता.