दक्षिण भारतातले नवरात्र. आकर्षक बाहुल्यांसोबत इथला नैवेद्यही अप्रतिम.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 07:28 PM2017-09-27T19:28:28+5:302017-09-27T19:43:51+5:30
-सारिका पूरकर-गुजराथी
नवरात्रीचा उत्साह देशभर असतो. प्रचंड उर्जा, उत्साह आणि उमेद देणारा हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे भारतीयांच्या महत्वाच्या सणांपैकी एक आहे. दक्षिण भारतातही हा उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्ती तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होतो. दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये प्रामुख्यानं हा सण साजरा होतो. नवरात्रीची मुळ संकल्पना तीच असली तरी तीनही राज्यात विविध प्रथा, परंपरा आढळून येतात.
दक्षिण भारतातील नवरात्रौत्सवाची एक छान खासियत म्हणजे कर्नाटकात नवरात्रीत विविध बाहुल्यांची सजावट केली जाते. यास गोंबे म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीस गोंबे पट्टडा संबोधलं जातं. विविध हावभाव, विविध पेहराव असलेल्या रंगीबिरंगी बाहुल्यांच्या आकर्षक सजावटीला कर्नाटकात विशेष महत्व आहे. आपण भुलाबाईभोवती मांडतो ना अगदी तसेच. तामिळनाडूतही बाहुल्यांची सजावट केली जाते. येथे बाहुलीला बोम्बई संबोधतात आणि बाहूल्यांच्या सजावटीला गोलू म्हणतात. तामिळनाडूमध्ये नवरात्रीनिमित्त घरी येणाºया पाहुण्यांना विड्याच्या पानावर नारळ, हळकुंड, सुकामेवा तसेच फळ देण्याची प्रथा आहे. तर आंध्रप्रदेशात बाहुलीला कोलूवू म्हणतात आणि बाहुल्यांच्या सजावटीला बोम्माला कोलूवू म्हणतात. थोडक्यात तीनही राज्यात बाहुल्यांची सुंदर सजावट केली जाते.. या वेगळ्या सजावटीबरोबरच नवरात्रात विविध नैवेद्य, पदार्थही दक्षिण भारतात केले जातात. पायसम अर्थात वेगवेगळ्या चवींच्या खिरी, भाताचे विविध प्रकार तसेच उसळींचे प्रकार दक्षिण भारतात विशेष करून केले जातात.
दक्षिण भारतातला नवरात्रीचा नैवेद्य
1) रवा केसरी
महाराष्ट्रात आपण जसा केशरी भात करतो तसा दक्षिण भारतात नवरात्रौत्सवात रवा केसरी हा गोडाचा पदार्थ म्हणून केला जातो. साजूूक तूपात रवा भाजून केशर घालून तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकात घातला जातो. नंतर काजू-बदाम,किसमिस घालून रवा केसरी नैवेद्यास ठेवला जातो. अत्यंत झटपट तयार होणारा हा पदार्थ दिवाळी तसेच अन्य सणांनाही बनवला जातो. साखरेच्या पाकात जर अर्धे दूध घालून पाक बनवला तर रवा केसरीची चव आणखी छान लागते.
2) व्हेन पोंगल
तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील हा लोकप्रिय पदार्थ असून नैवेद्यासाठी तो केला जातो. यास खारा पोंगल असही संबोधतात. तांदूळ-मुगडाळीची साऊथ इंडियन स्टाइल खिचडी देखील आपण यास म्हणू शकतो. मुगाची डाळ कोरडी भाजून तांदळासोबत मऊसर शिजवून घेतली जाते. नंतर साजूक तूपात काळीमिरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करु न ती खिचडीवर ओतली जाते. शेवटी तळलेले काजू त्यावर घातले जातात. म्हटलं तर नैवेद्य आणि म्हटलं तर एक पाचक खिचडी देखील. दक्षिण भारतात याच पोंगलचे विविध प्रकार नैवेद्य म्हणून केले जातात.मूगडाळ, तांदूळ, गुळ, पोहे, ओले खोबरे यांच्या वेगळ्या चवींचं गोड पोंगल देखील बनवले जातात.
3) मुरमु-याचा लाडू
मुरमु-याचा लाडू हा अत्यंत सोपा आणि झटपट तयार होणारा पदार्थ तामिळनाडूत नैवेद्याचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. एक कप गुळात अर्धा कप पाणी घालून त्याचा पाक तयार करु न त्यात मुरमुरे घालून त्याचे लाडू वळून त्याचा नैवेद्य दाखिवला जातो. आपल्या महाराष्ट्रात हे लाडू लग्न किंवा मौंजीच्या रूखवतात ठेवले जातात..तेच लाडू दक्षिण भारतातही बनवले जातात. खाद्य संस्कृती या भौगोलिक सीमांमध्ये अडकत नाही, नाही का !!!
4) पायसम
सोप्या भाषेत सांगायचं तर खीर. दक्षिण भारतात नवरात्रौत्सवात विविध खिरींचा नैवेद्य दाखिवला जातो. शेंगोळ्यांची खीर हा त्यातल्या त्यात खिरीचा किंवा पायसमचा वेगळा प्रकार दक्षिण भारतात पाहायला मिळतो. तांदळाच्या पीठाची उकड काढून गुळाच्या उकळत्या पाकात या उकडीच्या शेवया घालून उकळल्या जातात. नंतर साजूक तूप आणि खसखस पूड घालून खीर आणखी आटवून नैवेद्यासाठी ठेवली जाते. याचप्रकारे गव्हाच्या कणकेचे शेंगोळे देखील गुळाच्या पाकात उकळून त्याचीही खीर केली जाते. शिवाय जोडीला शेवया, तांदूळ, रवा, गाजर, साबुदाणा, लाल भोपळा यांची खीर देखील नवरात्रात बनवली जाते.
5) पुलिहोरा
भाताचा हा प्रकार दक्षिण भारतातील नैवेद्याच्या पदार्थांमधील एक विशेष आणि प्रमुख पदार्थ आहे. येथेही पुन्हा महाराष्ट्राशी थोडी नाळ जोडल्यासारखी वाटते. महाराष्ट्रात सणावारी मसालेभात बनवला जातो, तसा दक्षिण भारतात पुलिहोरा. पुलिहोरासाठी तांदळाचा भात मोकळा शिजवून घेतला जातो. नंतर चिंचेचा कोळ काढून त्यात गूळ मिक्स करून घेतला जातो. तेलात हिंग, मोहरी, जिरे, साबूत लाल मिरची, उडीद डाळ, चणा डाळ, शेंगदाणे यांची खमंग फोडणी करून त्यात चिंचेचा कोळ, हळद, आवडत असल्यास थोडा गरम मसाला घालूून चांगले परतवून शिजवलेला भात घातला जातो. चिंचेचा भात म्हणूनही हा भात ओळखला जातो. याच भाताला आणखी क्र ंची चव देण्यासाठी काळिमरी पावडर तसेच भाजलेल्या तीळाची पूडही घातली जाते.