ना मैदा, ना साखर तरीही बनवा भन्नाट केक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:15 PM2019-01-30T15:15:43+5:302019-01-30T15:19:41+5:30
मैदा, साखर आणि तत्सम वस्तू न वापरता घरगुती, पौष्टिक आणि चवदार केकची रेसिपी आम्ही घेऊन आलोय. तेव्हा हा केक नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा.
पुणे : केक म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात चमक येते. अनेकदा मैदा, साखर बघून केक खाण्याचा मोह टाळला जातो. पण आता त्याची गरज नाही. मैदा, साखर आणि तत्सम वस्तू न वापरता घरगुती, पौष्टिक आणि चवदार केकची रेसिपी आम्ही घेऊन आलोय. तेव्हा हा केक नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खुश करा.
साहित्य :
- गव्हाचे पीठ २ वाटी
- गूळ दीड वाटी
- बेकिंग पावडर १ चमचा
- एक अंडे किंवा दही एक वाटी
- दूध किंवा पाणी
- इसेन्स
- चॉकलेट पावडर आवडत असल्यास
- काजू, बदाम, मनुके, पिस्ता (बारीक तुकडे करून)
कृती :
- गूळ बारीक करून त्यात गव्हाचे पीठ करून घ्या.
- या पीठात एक अंडे फेटून टाका. अंडे सुमारे १० मिनिटे एका दिशेने फिरवून घेऊन फेस येईपर्यंत फेटून घ्या.
- अंडे घ्यायचे नसल्यास वाटीभर दही फेटून घ्यावे.
- हे फेटलेले साहित्य एकत्र करून दाट मिश्रण करावे. मिश्रण फार पातळ करू नये.
- मिश्रण एकजीव करण्यासाठी हॅण्ड मिक्सर किंवा साध्या मिक्सरचा वापर करा.
- यात नंतर चॉकलेट पावडर आणि इसेन्स टाकून एकजीव करा.
- त्यात बेकिंग पावडर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करा.
- केक तयार करण्याच्या भांड्याला आतून व्यवस्थित तूप लावून घ्या.
- आता त्यात तयार मिश्रण घालून वरून काजू, बदाम आणि इतर ड्राय फ्रूट्सच्या मदतीने सजवा.
- आता हा केक १५ मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा.
- किंवा गॅसवर जाड ताव ठेवून त्यावर केकचे भांडे झाकण ठेवून मंद आचेवर १५ ते १८ मिनिटे बेक करा.
- किंवा हे भांडे कुकरमध्ये ठेवून त्यात शिट्टी काढून १५ मिनिटे बेक करा.
- वेळ संपल्यावर त्यात केकमध्ये सूरी टाकून पूर्ण तयार झाला की नाही हे तपासा. मिश्रण सुरीला चिकटल्यास ५ मिनिटे अधिक बेक करा.
- पौष्टिक, चवदार केक तयार.