तुम्ही कच्चं दूध पिता का?; वेळीच सावध व्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 03:00 PM2019-09-17T15:00:11+5:302019-09-17T15:07:15+5:30
अनेकदा डॉक्टर्स आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असतं. जे शरीरातील हाडांचं आरोग्य राखण्यासोबतच इतर पोषक तत्वही शरीराला पुरवतं.
अनेकदा डॉक्टर्स आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला देतात. दूधामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असतं. जे शरीरातील हाडांचं आरोग्य राखण्यासोबतच इतर पोषक तत्वही शरीराला पुरवतं. परंतु अनेक लोक दूध न उकळता कच्चंचं पितात. पण असं करणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं.
साधारणतः असं मानलं जातं की, दूधावर प्रक्रिया केल्यानंतर त्यातील पोषक तत्व कमी होतात. परंतु, असं अजिबात नाही. दूध कच्चं असो वा प्रक्रिया केलेलं, दोघांमध्येही न्यूट्रिशनचं प्रमाण समान असतं. दूधामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांसारखे मिनरल्स असतात. जे उच्च तापमानातही नष्ट होत नाहीत.
कच्चं दूध पिण्यामागे लोकांची विचारसरणी
काही लोकांचं म्हणणं आहे की, कच्चं दूध प्यायल्याने जास्त फायदे होतात. पण हे फक्त लॅक्टोस इंटॉलरंट लोकांसाठीच फायदेशीर ठरतं. कच्च्या दूधामध्ये लॅक्टेस मोठ्या प्रमाणावर असतं. जे लॅक्टोज पचवण्यासाठी मदत करतं. परंतु, प्रक्रिया केलेल्या दूधामधील लॅक्टेस नष्ट होतं. याव्यतिरिक्त कच्चं दूध अस्थमा, एक्जिमापासून स्किन अॅलर्जीपर्यंत फायदेशीर ठरतं. लोकांचा असाही समज आहे की, कच्च्या दूधामध्ये जास्त अॅन्टी- मायक्रोबियल असतात. जसं की, इम्यूनोग्लोब्यूलिन, लाइसोजायम आणि लॅक्टोपरऑक्सिडेस. हे नुकसानदायी जीवाणू रोखतात. ज्यामुळे दूध खराब होत नाही.
का पिऊ नये कच्चं दूध?
कच्च्या दूधामध्ये शरीरासाठी घातक असणारे अनेक बॅक्टेरिया असतात. न्यूट्रल पीएच बॅलेंस, मुबलक प्रमाणात पाणी आणि इतर अन्य पोषक तत्व असल्यामुळे कच्च्या दूधामध्ये बॅक्टेरिया लगेच तयार होतात. एवढचं नाहीतर बरेच दिवस जिवंतही राहतात. याच कारणामुळे कच्चं दूध लगेच खराब होतं.
कच्च्या दूधामध्ये Salmonella, Escherichia, Campylobacter, E. Coli आणि Cryptosporidium यांसारखे खतरनाक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे कच्चं दूध प्यायल्याने बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये पोहोचतात. त्यामुळे रिअॅक्टिव्ह आर्थकायटिसपासून डायरिया, डिहायड्रेशन, गुलियन-बॅरे सिंड्रोम आणि हीमोलिटिक यूरिमिक सिंड्रोम यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याव्यतिरिक्त उलट्या होऊ शकतात आणि तापही येऊ शकतो.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कच्च्या दूधाच्या फायद्यांना आता सिद्ध केले जाऊ शकत नाही. तसेच अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, कच्च्या आणि प्रक्रिया केलेल्या दूधामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण समान असतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)