पावसाळ्यात आपलं मन प्रसन्न होतंच पण आपलं घर मात्र कुबट आणि कोंदट वाटतेय का? या 7 युक्त्यांनी घरालाही देता येतो मान्सून टच.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 06:43 PM2017-06-13T18:43:21+5:302017-06-13T18:57:14+5:30
पावसाच्या प्रसन्न स्वभवाप्रमाणे आपलं घरही आपण छान हिरवंगार आणि प्रसन्न करू शकतो.
-सारिका पूरकर-गुजराथी
‘धुंद आज वेली...धुंद फुलं-पाने’ असेच चित्र, असाच फ्रेशनेस आता पाऊस आपल्यासोबत घेऊन येणार आहे. अवघ्या सृष्टीवर हिरवाईचा साज चढवून पाऊस येतोय.. उन्हाळा सरता सरताच आपलं मन पावासासाठी सज्ज झालेलं असतं. पण पावसाच्या हसऱ्या-नाचऱ्या स्वागतासाठी तुमचं घरही तुमच्याऐवढच सज्ज असतं का? पावसाळा म्हटलं की बाहेर नाही म्ह्टलं तरी वातावरण कुंदच असतं. पण म्हणून घराचाही लूकही कुंदच असला पाहिजे असं नाही. पावसाच्या स्वभवाप्रमाणे आपलं घरही आपण छान हिरवंगार आणि प्रसन्न करू शकतो.
१) सुगंधित कॅण्डलस
पावसाळा म्हटलं की सगळीकडे पाणी साचून चिखल तयार होतो. कचरा कुजतो. त्यामुळे सतत दुर्गंधी निर्माण होते. मातीचे पाय घरात येतात. त्यामुळेही कुबट वास सतत घरात पसरतो. आजूबाजूला माशा, चिलटे घोंगावतात त्या वेगळ्या. अशा परिस्थितीत तुम्हाला छान आल्हाददायक वातावरण हवं असेल तर घरात सुगंधित कॅण्डल्स लावा. या कॅण्डल्स लावण्यासाठी तुम्ही घरातील सेंटर टेबल, वॉल युनिटचे डेस्क याचा वापर करु शकता. किंवा फ्लोटिंग कॅण्डल्स लावू शकता. कॅण्डल्स स्टॅण्डही मिळतात. ते देखील वापरु शकता. सुगंधित कॅण्डल्स अनेक प्रकारच्या सुगंधात मिळतात. त्यामुळे घरात छान सुगंध दरवळून कुबट वास कमी होण्यास मदत मिळेल. शिवाय डिझायनर कॅण्डलमुळे वेगळा लूकही येईल.
२) रेनकोट स्टॅण्ड
पावसात भिजून घरी आलं की ओले रेनकोट्स, छत्र्या ठेवायच्या कुठे? हा प्रश्न नेहमीच सतावतो. कारण एकतर यामधून सारखं पाणी गळत असतं. घर लहान असेल, घराला गॅलरी नसेल तर मग हा प्रश्न अजूनच बिकट होतो. यावरही डेकोरोटिव्ह पर्याय आहे. होय, ओले रेनकोट्स ठेवण्यासाठीही तुम्ही क्रिएटिव्हिटीची जोड देऊ शकता. सोपं आहे, घरात जुना प्लॅस्टिकचा ड्रम असेल किंवा मोठा डबा असेल तर त्याला प्लेन सोनेरी रंग देऊन टाका. चांगला वाळू द्या, नंतर त्यावर वॉर्निश लावा. पुन्हा वाळू द्या. आता हा ड्रम घरात एका कोपऱ्यात ठेवा. त्यात ओले रेनकोट्स आणि छत्र्या ठेवत जा. दिसायलाही एक कॉर्नर पीस म्हणून छान दिसेल आणि तुमची सोयही होऊन जाईल. ड्रम नसेल तर बाजारात मोठं रांजण मिळतात ते देखील वापरता येतील. आणखी डेकोरेटिव्ह हवं असेल तर विविध आकाराच्या रेडिमेड बास्केट्स, कंटेनर्स (मोठे ) मिळतात, त्याचा वापरही करता येतो.
३) इनडोअर रोपं
पावसाळा आणि हिरवाई, पावसाळा आणि सृजन, पावसाळा आणि नवजीवन हे अतूट नातं आहे. घरातही तुम्ही हा ग्रीन टच सजावटीला देऊ शकता. भरपूर इनडोअर रोपं घरात आणा आणि त्याची आकर्षक मांडणी करा. पेंटिंग्ज, फ्रेम्स यात देखील हिरव्या रंगाला प्राधान्य द्या. यामुळे घर देखील पावसाच्या तालावर डोलतय की काय असा भास होईल.