आपलं ‘लोणचं’ आणि त्यांचं ‘पिकल’..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:41 AM2024-09-06T11:41:28+5:302024-09-06T11:41:36+5:30
Food News: मागच्या लेखात आपण खारवणे अर्थात सन ड्राइंग याबद्दल वाचलं. याचाच एक उपप्रकार म्हणजे मुरवणे. या मुरवण्यातही अनेक प्रकार आहेत. साधारणपणे यात भाज्यांना मीठ लावून बरणी अथवा माठात ठेवून, झाकण घट्ट लावून त्या उन्हात ठेवल्या जातात.
मागच्या लेखात आपण खारवणे अर्थात सन ड्राइंग याबद्दल वाचलं. याचाच एक उपप्रकार म्हणजे मुरवणे. या मुरवण्यातही अनेक प्रकार आहेत. साधारणपणे यात भाज्यांना मीठ लावून बरणी अथवा माठात ठेवून, झाकण घट्ट लावून त्या उन्हात ठेवल्या जातात.
भाज्या अथवा आवळा, लिंबू यासारख्या फळांना मिठामुळे पाणी सुटते अन् उन्हामुळे अन् हवेच्या अभावामुळे या द्रावणात जीवाणूंची वाढ होण्यास अटकाव होतो. काही दिवसांत या भाज्यांचा किंवा फळांचा पोत काहीसा मऊ होतो. यात दुसरा प्रकार म्हणजे मिठाचं पाणी करून त्यात भाज्या बुडवून ठेवणे. याला ‘ब्राईनिंग’ असंही म्हणतात.
याचीच पुढची पायरी म्हणजे पिकलिंग. आपल्याला माहिती आहे पिकल म्हणजे लोणचं; पण आपलं लोणचं आणि जगभरात ज्याला ‘पिकल’ म्हणतात ते, यात बराचसा फरक आहे. आपल्या लोणच्यात कुटलेले मसाले, तेल, मीठ, साखर असे घटक असतात. तर जगभरात मीठ, विनेगर, तेल, काही ठिकाणी साखर, अख्खे म्हणजेच खडे मसाले, अशा घटकांचा वापर होतो. पुढील काही लेखांत आपण ‘पिकलिंग’ याविषयी वाचणार आहोत. त्यामध्ये पिकलिंगचा इतिहास अन् जगभरातील निरनिराळे प्रकार, या गोष्टी येतीलच.
आपण लोणच्यांची दुकानं सर्रास पाहतो; पण हे फक्त आपल्याकडेच नसतं. तुर्कीमधे पिकल्सची खूप मोठमोठी दुकानं आहेत. म्हणजे अशा मोठ्या खोल्यांमध्ये वर छतापासून खाली जमिनीपर्यंत लाकडी कपाटात काचेच्या लहान-लहान बरण्यांमधे पिकल्स ठेवलेली असतात. ही पिकल्स ऑलिव्ह, गर्किन, लहान काकड्या, मिरच्या, भोपळी मिरच्या, टोमॅटो, कांदे, बीटरूट आदींच्या फोडी विनेगर, ऑलिव्ह तेल अन् काही विशिष्ट मसाल्यांच्या मिश्रणात मुरवलेल्या असतात.
विशेष बाब म्हणजे तिथे नुसतं पिकल ज्यूस लहानशा ग्लासमधून प्यायला देतात. ज्यांना आंबट-चिंबट खायला खूप आवडतं त्यांच्यासाठी ही अशी पिकल्सची दुकानं म्हणजे केवळ सुख आहेत. अशी दुकानं मध्यपूर्व देशांत अनेक ठिकाणी आहेत.या सगळ्याविषयीच आपण पुढील काही लेखांत जाणून घेणार आहोत.