भरपूर फायदे असूनही जास्त खाऊ नये पालक, यातील ऑक्सलेट ठरू शकतं घातक; कसं ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:10 PM2024-09-21T16:10:29+5:302024-09-21T16:37:01+5:30
Oxalate in Spinach : अनेक फायदे असूनही पालक जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊ...
Oxalate in Spinach : जेव्हाही वेगवेगळ्या पौष्टिक हिरव्या पालेभाज्यांचा विषय निघतो तेव्हा पालक भाजीचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं. कारण पालकामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्न आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. पालकाचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, शरीरात रक्त वाढतं आणि हाडंही मजबूत होतात. इतके फायदे असूनही पालक जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कसं ते जाणून घेऊ...
जास्त पालक खाण्याचे नुकसान
प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, पालक भलेही खूप पौष्टिक भाजी असली तरी यात ऑक्सलेटचं प्रमाणही भरपूर असतं. शरीरात जर ऑक्सलेट जास्त प्रमाणात गेलं तर याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.
किडनी स्टोन
पालकमध्ये असलेल्या ऑक्सलेट तत्वामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. त्यामुळेच किडनी स्टोन असलेल्यांना पालक न खाण्याचा सल्ला दिला जातो. लघवीमध्ये जाणारं ऑक्सलेट स्टोनचं रूप घेऊ शकतं.
रक्त पातळ होतं
जास्त ऑक्सलेटमुळे आपल्या शरीराचं नुकसान तर होतंच, सोबतच पालकामधील व्हिटॅमिनने रक्तही पातळ होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला सतत थकवा आणि कमजोरी जाणवू लागते.
औषधाचा प्रभाव होईल कमी
पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के सुद्धा असतं जे औषधांचा प्रभाव कमी करण्याचं काम करतं. खासकरून हृदय रोग असलेल्या रूग्णांना ब्लड थिनर दिलं जातं, त्यामुळे त्यांना पालक भाजी खाऊ नये.
ऑक्सलेटचा प्रभाव कसा कमी कराल?
पालक जर तुम्ही कच्ची किंवा ज्यूसच्या रूपात सेवन केली तर शरीरात भरपूर प्रमाणात ऑक्सलेट जातं. यापासून बचाव करण्यासाठी आधी पालक थोडी शिजवून घ्या. त्याशिवाय पनीर, दही यांसारख्या कॅल्शिअम रिच फूडसोबत खावी. यानेही ऑक्सलेटचा वाईट प्रभाव कमी होईल.