Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 12:05 PM2024-11-26T12:05:51+5:302024-11-26T12:07:23+5:30
Perfect Tea Recipe: चहाची रेसेपी सोपी असली, तरी सगळ्यांनाच तो चांगला करता येतो असं नाही; मात्र तुम्हाला उत्तम चहा बनवायचा असेल तर दिलेली ट्रिक नक्की वापरून बघा!
भारतीयांचा रक्तगट विचाराल तर तो 'टी' पॉझिटिव्हच निघेल! कारण निमित्त कोणतेही असो, सोबतीला चहा लागतोच! त्यात आता हिवाळा आणि वाढती थंडी पाहता आल्याचा फक्कड चहा तर हवाच हवा! थंडीत आल्याचा चहा प्यायल्याने रोग प्रतिकार शक्ति देखील वाढते. आता नुसतं वाचूनही चहाची तलफ आली असेल तर जरा थांबा, लेख पूर्ण वाचा, त्यात दिलेल्या आल्याची ट्रिक वापरा आणि घरच्या घरी बासुंदी चहाचा आस्वाद घ्या!
'चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा हवा!' त्यातही तो आलं किसून टाकलेला असेल तर विचारूच नका! मात्र अनेकांना चहात आलं टाकल्यावर चहा फाटल्याचा, नासल्याचा किंवा कडवट झाल्याचा अनुभव येतो. मग टपरी वरच्या खलबत्त्यात कुटून टाकलेल्या आल्याचा आवाज कानात घुमतो. आलं नक्की कसं टाकावं असा प्रश्न पडतो, यावर उत्तर म्हणून ही खास ट्रिक फॉलो करा!
चहा बनवण्यासाठी खलबत्त्यात कुटून, ठेचून घेतलेलं आलं घालणं कधीही चांगलं! कारण आले कुटून घातल्यामुळे चहामध्ये आल्याची चव छान उतरते. आले किसून टाकल्यामुळे चहा कडू होऊ शकतो. आल्याची चव आणि सुगंध अधिक तीव्र होते, ज्यामुळे चहाची चव बिघडते. आल्याचे तंतू तुटतात आणि ते चहामध्ये पूर्णपणे एकजीव होऊ शकत नाहीत.
आलं घातल्यावर चहा फाटतो/ नासतो?
तुमचाही चहा आलं घातल्यावर नासत असेल, दूध फाटत असेल, तर चहामध्ये आलं घालण्याची योग्य वेळ समजून घ्या. चहाचे आधण ठेवल्यावर त्यात पाणी उकळल्यावर चहा पावडर आणि साखर घाला. चहा पावडर छान एकजीव झाली की लालसर रंग येईल, तेव्हा कुटून घेतलेलं आलं टाका आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढा. दुसऱ्या पातेल्यात दूध गरम करून घ्या आणि १० सेकंद चहा उकळून झाला की कपात गाळून ओतल्यावर त्यात हवे तेवढे दूध घाला, चहा फक्कड लागणार याची गॅरेंटी!
चहाने ऍसिडिटी कशी टाळावी?
अति तिथे माती, हे आपण जाणतोच. चहाने तजेला येतो हे मान्य, पण दिवसभरात पाच-सात कपाच्या वर चहा पीत असाल तर साखर वाढेल आणि ऍसिडिटीही सुरु होईल. कोणतीही गोष्ट प्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होत नाही. चहा फार तर दोन ते तीन वेळा प्यावा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी! रात्री चहा प्यायल्याने झोपेवर परिणाम होतो. तसेच तीनपेक्षा जास्त वेळा चहा प्यायल्यानेही त्रास होतो. भूकेवर, पचन शक्तीवर आणि दाताच्या आरोग्यावर परिणाम होतो. चहा सेवनानंतर गॅस आणि ऍसिडिटी टाळायची असेल तर चहा पिण्याआधी भरपूर पाणी प्या, त्यामुळे चहाचे दुष्परिणाम शरीरावर होणार नाहीत आणि आवश्यक लाभ शरीराला मिळतील.
चला तर, एवढं चहा पुराण वाचून झालं असेल तर आता एक कप चहा टाका आणि या बोचऱ्या थंडीत मस्त एन्जॉय करा!