यंदा लोणच्याचा हंगाम मिडी उप्पीनकायीनं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 09:58 AM2024-02-02T09:58:49+5:302024-02-02T09:59:06+5:30
Food: फेब्रुवारी महिना सुरू झाला की कर्नाटक किनारपट्टी, किनारपट्टी व घाटमाथ्याच्या मधल्या पट्ट्यात लोणचं घालायची लगबग सुरू होते.
- साधना तिप्पनाकजे
(खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक)
फेब्रुवारी महिना सुरू झाला की कर्नाटक किनारपट्टी, किनारपट्टी व घाटमाथ्याच्या मधल्या पट्ट्यात लोणचं घालायची लगबग सुरू होते. तुम्हाला वाटेल, फेब्रुवारीत लोणचं म्हणजे हिवाळ्याच्या अखेरच्या आवळा, लिंब, गाजराच्या लोणच्याची घाई असू शकेल; पण शिवमोगा, दक्षिण कन्नडा, उत्तर कन्नडा, उडुपी भागात कैरीच्या लोणच्याची ही लगबग असते.
या भागामध्ये अख्ख्या बाळकैरीचं लोणचं खूप प्रसिद्ध आहे. कैरी इंचभर झाली की, तिचं लोणचं घालतात. सगळ्याच बाळकैऱ्यांचं लोणचं करत नाहीत. लोणच्याकरताची झाडं ठरलेली असतात. अनुभवातून ती हेरली जातात. या बाळकैऱ्यांच्या लोणच्याला कन्नडामध्ये मिडी उप्पीनकायी म्हणतात. मिडी म्हणजे बाळकैरी आणि उप्पीनकायी म्हणजे लोणचं. बरं या उप्पीनकायी शब्दाची फोड आणि अर्थ काय तर मीठात मुरवलेलं कच्चं किंवा कोवळं फळ. तुम्हाला आता लक्षात आलं असेलच मिठाला उप्पू म्हणतात. तर या उप्पीनकायीत तेल अजिबातच नसतं. हो अगदी बरोबर वाचलंत. हे लोणचं बिनातेलाचं असतं.
आपल्याला तेलाचा तवंग असलेला लोणच्याचा खार पाहायची सवय आहे; पण या उप्पीनकायीत कणभरही तेल नसतं. मग हे लोणचं टिकतं कसं? - त्याच्या नावातच आहे बघा. या कैऱ्या जाड किंवा खड्या मिठात मुरवतात. मीठ अगदी आतवर मुरलं की बाळकैरीला सुरकुत्या येतात. मग त्यात लोणच्याचा मसाला घालतात. मिठात चांगलं मुरलेलं मिडी उप्पीनकायी दोन वर्षे आरामात टिकतं. सर्व लोणच्यांच्या नियमानुसार हवा आणि उजेडाचा थेट संपर्क येऊ द्यायचा नाही. लागेल तसं मोठ्या बरणीतून रोजच्या खाण्याकरता थोडं थोडं काढायचं. लोणच्याचा मसालाही अगदी साधासुधाच. मोहरी, तिखट, हळद एवढेच जिन्नस यात असतात. मिठातलं मुरणं आणि बाळकैरीची स्वतःची चव या उप्पीनकायीचा युएसपी आहे. शिवमोगामधलं आप्पे मिडी उप्पीनकायी खूप प्रसिद्ध आहे.
शिवमोगातल्या कैरीची ही आप्पे प्रजाती अर्धा इंचाची झाली की, तिचं लोणचं घालतात. आप्पेमिडीतल्या बाळकैरीची धरू लागलेली कोवळी कोयही सुंदर लागते. तर मंडळी, फेब्रुवारी सुरू झाला आहे. बाजारात बाळकैऱ्या मिळू लागल्या आहेत. तुम्हाला लोणची आवडत असतील तर यंदाच्या लोणच्याचा हंगाम मिडी उप्पीनकायीनं सुरू करा!
(sadhanasudhakart@gmail.com)