पोहे खा, पोहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 01:28 PM2023-06-11T13:28:46+5:302023-06-11T13:29:37+5:30

खाद्यप्रेमींनी गेल्याच आठवड्यात पोट भरून पोहे खात जागतिक पोहे दिवस साजरा केला. पोटभरीचे, चटकन तयार होणारे, चवीलाही छान अशा या पोह्यांची दुनिया आहे तरी कशी, या रुचकर आणि स्वादिष्ट प्रवासाचा बहारदार वेध...

pohe its importance and type | पोहे खा, पोहे!

पोहे खा, पोहे!

googlenewsNext

खाद्यप्रेमींनी गेल्याच आठवड्यात पोट भरून पोहे खात जागतिक पोहे दिवस साजरा केला. पोटभरीचे, चटकन तयार होणारे, चवीलाही छान अशा या पोह्यांची दुनिया आहे तरी कशी, या रुचकर आणि स्वादिष्ट प्रवासाचा बहारदार वेध...

गरमागरम वाफाळते पिवळेधम्मक पोहे, त्यातल्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर यांच्या हिरव्या रंगाने त्याला आलेली नजाकत, शेजारी लिंबाची फोड, वरून ओल्या खोबऱ्याची पखरण... पोहे म्हटलं की हेच दृष्य डोळ्यापुढे उभे राहते. पोह्यात जर कांदे, बटाटे, गाजर, भाज्या, शेंगदाणे असतील, तर त्यांच्या रंगानुसार पोह्यांची रंगसंगतीही खुलत जाते. 

नाश्त्याला मस्त पोहे खाऊन अनेकांचा दिवस सुरू होतो. नंतरही भुकेच्यावेळी वेगवेगळ्या रूपात पोहे समोर येतात. ते कसेही खाल्ले तरी रूचकर लागतात. पोट भरून टाकतात. या पोहे रसिकांनी गेल्या आठवड्यात जागतिक पोहे दिवस साजरा केला आणि आपले पोहे प्रेम सिद्ध केले. 

कुणी कांदे-पोहे खातात, तर कुणाला बटाटे पोहे आवडतात. कुठे त्यावर तर्री घातली जाते, तर कुठे सोबतीला शेव किंवा जिलेबी येते. कोणी गोपाळकाल्याच्या आठवणी काढत दह्यासोबत पोहे खातात. कुणी दुधासोबत, तर कुणी चहासोबत. काहींना नुसते तेल, तिखट, मसाला घालून पोहे आवडातात, तर काहींना दडपे किंवा कोळाचे पोहे आवडतात. तुमची पसंती काहीही असो, पोहे कोणत्याही रूपात खुलतात. पोटभरीचे होतात. तृप्तीचा आनंद देऊन जातात.

पोहे असे तयार होतात... 

पोहे ही महाराष्ट्राने भारतीय खाद्यसंस्कृतीला दिलेली देणगी मानली जाते. जेव्हा शिंदे (आताचे सिंधिया), होळकर मध्य प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्यांच्यासोबतच पोहेही मध्य प्रदेशात रूजले. 

आपल्याकडच्या तांदळातील जवळपास १० टक्के पोहे बनवण्यासाठी वापरले जातात. यंत्राद्वारे पोहे करताना साळ गरम पाण्यात भिजवली जाते, तर घरगुती पद्धतीने पोहे तयार करताना ती साध्या पाण्यात भिजवली जाते. नंतर ती विशिष्ट पद्धतीने- ठराविक तापमानावर भाजतात. यात साल निघून जाते. नंतर ते मशीनमध्ये किंवा कांडून चपटे केले जातात. 

साळ भाजताना अधिक वेळ लागला,तर साळीच्या लाह्या तयार होण्याचा धोका असतो. त्यामुळे सरावानेच ते जमू शकते. काही ठिकाणी अशा पोह्यांचे पीठ करून तेही खाण्याची पद्धत आहे.  

साळीतील तांदळाचा वापर करून पोहे तयार केले जातात. त्यासाठी वापरला जाणारा तांदूळ, त्याचा रंग, चव, गंध यावरून त्या त्या प्रकारच्या पोह्यांची प्रत बदलते. आपल्याकडे पातळ पोहे, जाड पोहे असे प्रकार वर्षानुवर्षे प्रसिद्ध आहेत. पण पापडासाठी लागणारे तांबड्या रंगाचे पोहे, हल्ली डाएट पाळणाऱ्यांसाठी ब्राऊन राइसचे मिळणारे पोहे हे त्यातले सहज ठावूक असलेले प्रकार.

युद्धाच्या काळात पोह्यांचे महत्त्व

१८४६ मधला बॉम्बे गॅरिसनच्या एका आदेशाचा संदर्भ दिला जातो. युद्धावर जाताना प्रत्येक सैनिकाजवळ पोहे असलेच पाहिजेत, असा आदेश त्याने दिल्याचे सांगतात. १८७८ मध्ये सायप्रसमधून भारतात येणाऱ्या सैनिकांनी म्हणे पोहे नसतील, तर बोटीवर चढणार नाही, अशी मागणी केल्याचे सांगतात. कारण पोहे पोटभरीचे. साधे किंवा गरम पाणी घालूनही खाता येतात, असे त्यांचे म्हणणे होते.

राज्या-राज्यांची खासियत

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, गुजरात, राजस्थानात वेगवेगळ्या प्रकारे पोहे-पोह्यांचे पदार्थ केले जातात. पोहेबहाद्दरांनी ७ जून हा जागतिक पोहे दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. पोह्याचे मूळ जरी महाराष्ट्रात सापडत असले, तरी या दिवसाला जन्म दिला इंदूरकरांनी.

गुणकारी पोहे 

- पचायला हलके, तरीही पोटभरीचे. 
- ऊर्जा आणि कार्बोहायड्रेटसने भरपूर.
- ग्लुटेन ज्यांना चालत नाही, त्यांच्यासाठी उपयुक्त.
- लोहाची कमतरता भरून काढणारे.
- बराच काळ भूक भागत असल्याने नाश्त्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त. डाएट करणाऱ्यांना फायदेशीर.
- पोह्यासोबत कांदे, बटाटे, भाज्या, दूध, दही, मसाला, लोणच्याचा खार असे काहीही छान लागत असल्याने आपल्याकडे पोहे करण्याचे जसे वेगवेगळे प्रकार आढळतात, तसेच ते खाण्याचेही प्रकार सापडतात.

प्रकार 

- कांदे पोहे
- बटाटे पोहे
- वांगी पोहे
- मटार पोहे
- तर्री पोहे
- दूध पोहे
- दही पोहे
- कोळाचे पोहे
- दडपे पोहे

अन्य पदार्थ 

- चिवडा
- पोह्याचे पापड-मिरगुंड 
- पोह्याचे वडे
- पोह्याचे कटलेट 
- पोह्याची भजी 
- पोह्याचे लाडू

कथा कृष्ण-सुदाम्याची 

सांदिपनी ऋषींच्या आश्रमातील मित्र कृष्ण आणि त्याचा गरीब मित्र सुदामा यांच्या मैत्रीची कथा सर्वांना ठावूक आहे. कृष्णाच्या भेटीसाठी सुदाम्याने नेलेली पोह्यांची पुरचुंडी पूर्वी अनेकजण प्रवासातील अन्न म्हणून सोबत नेत.

 

Web Title: pohe its importance and type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न