फिटनेससाठी सर्रास प्रोटीन पावडर घेताय का? मग ती तुम्हाला अनफिट करू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 07:24 PM2017-08-11T19:24:45+5:302017-08-11T19:40:25+5:30

जाहिरातींच्या भुलभुलैय्यात अडकून प्रोटिन पावडर घेण्याची इच्छा होत असेल तर आधी थांबा, विचार करा, वैद्यकीय सल्ला घ्या आणि मग्च पुढे जा. नाहीतर प्रोटीन पावडर फायदेशीर ठरण्याऐवजी घातक ठरू शकते.

Protein Powder. Are you take it blindly? It's dangerous | फिटनेससाठी सर्रास प्रोटीन पावडर घेताय का? मग ती तुम्हाला अनफिट करू शकते.

फिटनेससाठी सर्रास प्रोटीन पावडर घेताय का? मग ती तुम्हाला अनफिट करू शकते.

googlenewsNext
ठळक मुद्दे* बाजारात मिळणार्या प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेकमध्ये रिकॉम्बिनंट बोव्हिन ग्रोथ हार्मोन आढळून येतात. हे हार्मोन मानवी तसेच गायीसारख्या पशूंच्या शरीरासाठी घातक असतात.* प्रोटीन पावडरींमधूनअस्पार्टेम जर शरीरात सतत जात राहिलं तर थकवा, आळस, निद्रानाश, मायग्रेनसारखे विकार होऊ शकतात.* जवळपास सर्वच प्रोटीन पावडरींमध्ये ल्याक्टोज नावाचा घटक पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. हा घटक शरीरातील पेशी आणि अवयवांसाठी अत्यंत घातक ठरु शकतो.




- सारिका पूरकर- गुजराथी


टीव्ही लावायचाच उशीर की सुरु होतो जाहिरातींचा रतीब. बरं हा रतीब इतका सोज्वळपणे प्रेक्षकांसमोर घातला जातो ना, की विचारता सोय नाही. या अशा सोज्वळ जाहिरातींच्या रतीबातील एक असते ती मुलांच्या वाढीसाठी दुधातून दिल्या जाणार्या  प्रोटीन पावडरींची. अमूक पावडर दुधातून घेतल्यानं मुलं कशी स्पर्धेत जिंकतात , अमूक पावडर घेतली की मुलांची उंची कशी ताडामाडासारखी वाढते, अमूक पावडर घेतल्यानं मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढते.. असे बरेच उपद्वव्याप या जाहिरातींमध्ये चालूच असतात. नुसतंच मुलांच्या बाबतीत नाही बरं का, तर महिलांची हाडं कशी ठिसूळ होतात, पुरूषांना ताकदीसाठी, बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन पावडर किती गरजेची आहे हे तुमच्या मन मेंदूवर ठसवणार्या  जाहिरातीही कमी नाहीयेत.. एवढेच कशाला आगपेटीच्या काडीसारखी मुलगी दिसत होती, पण अमूक पावडर घेतल्यामुळे तिचं वजन वाढलं, मुलगा बारीक होता म्हणून मुली लग्नाला नकार द्यायच्या पण अमूक पावडरीमुळे वजन वाढून तो रूबाबदार दिसू लागला.. अशा जाहिरातींचीही जंत्री कमी नाहीये.. शिवाय जीम इन्स्ट्रक्टर आहेतच पावडरींचा डोस द्यायला.. मग काय, आकर्षक पॅकिंगमध्ये मिळणार्या  या पावडरींच्या प्रेमात पडून हेल्थ सप्लिमेंट म्हणून ती घ्यायला लगेचच सुरूवात केली जाते.
वैद्यकीय दृष्ट्या प्रोटीन शरीराच्या, हाडांच्या निकोप वाढीसाठी, बळकटीसाठी अत्यावश्यक आहे, हे मान्यच आहे. तसेच सर्वच प्रोटीन पावडर या शरीरास हानिकारक असतात असंही नाही, मात्र प्रोटीनची शरीरातील कमतरता भरु न काढण्यासाठी, या जाहिरातींच्या भुलभुलैय्यात अडकून आपण सर्वांनीच प्रोटीन पावडरींचा जो धडाका घराघरात सुरु केला आहे ना , तो जरा थांबवून त्याचा विचार करायला हवा.



प्रोटीन पावडर.. जरा जपूनच.. कारण

1) हानिकारक हार्मोन्स

बाजारात मिळणार्या प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेकमध्ये रिकॉम्बिनंट बोव्हिन ग्रोथ हार्मोन आढळून येतात. एका अभ्यासाअंती संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की हे हार्मोन मानवी तसेच गायीसारख्या पशूंच्या शरीरासाठी घातक असतात.. शरीरातील रक्तपेशींसाठी तर हे जरा जास्तच हानिकारक ठरतात. याव्यतिरिक्त पचनसंस्था, गर्भधारणा यासंदर्भातही या हार्मोनमुळे नुकसान होते.
 

2) कृत्रिम गोडवा
या प्रोटीन पावडरींमध्ये गोड चवीसाठी साखरेऐवजी
अस्पार्टेम नावाचं कृत्रिम स्वीटनर वापरलं जातं. फूड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या मतानुसार तर अन्नघटकांमुळे जे विपरित परिणाम शरीरावर होतात त्यातील 75 टक्के परिणाम हे एकट्या अस्पार्टेममुळे होतात. या
प्रोटीन पावडरींमधून हे अस्पार्टेम जर शरीरात असंच जात राहिलं तर थकवा, आळस, निद्रानाश, मायग्रेनसारखे विकार होऊ शकतात..
 

3) अ‍ॅलर्जींना आमंत्रण

जवळपास सर्वच प्रोटीन पावडरींमध्ये ल्याक्टोज नावाचा घटक पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. हा घटक शरीरातील पेशी आणि अवयवांसाठी अत्यंत घातक ठरु शकतो. शरीरातील नसांमध्ये याचा शिरकाव म्हणजे तुमच्या आरोग्यास खूप मोठा धोका असल्याचा सिग्नल
ठरतो.
 

4) दूधाचीच पावडर परंतु निकृष्ट दर्जाची

प्रोटीन पावडरीच्या बाबतीत ही बाब समजून घेणं अत्यंत गरजेची आहे. व्हे प्रोटीन पावडर म्हणून बाजारात
विकली जाणारी प्रोटीन पावडर ही पूर्ण दुधातील काही घटकांचा नाश करून बनवली जाते. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर पनीरसाठी दुध नासवून ते
गाळून घेतलं की खाली जे पाण्यात उरतं ते असते हे व्हे.. हे वाळवून त्याचीच पावडर बनवली जाते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेतील दुधातील पोषक घटकांचा नाश होतो आणि शरीराला लाभ होण्याऐवजी नुकसानच जास्त होतं.
 

5) योग्य फॅट्सचा अभाव

कॉन्स्ट्रेटेड प्रोटीन पावडरींमध्ये शरीरासाठीआवश्यक पोषक तत्वांना सामावून घेण्याची क्षमता असलेले स्याच्युरेटेड फॅट्स नसतात. म्हणूनच शरीरासाठी या पावडरी खूप घातक ठरतात हे फॅट्स जर पावडरींमध्ये नसतील तर थायरॉईड, किडनी समस्या, हाडांच्या समस्या यांचा सामना तुम्हाला करावा लागेल हे निश्चित.

6) धातूंचा शिरकाव

मानवी शरीरात विविध मार्गानं धातूंचा शिरकाव झाला तर त्याचा निचरा होण्यासाठी, शरीरातून त्याचे अस्तित्त्व संपण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागतात. आणि काही प्रोटीन पावडरींमध्ये धातूंचा अंश आढळून येतो. यामुळे तुमच्या शरीरात विष तयार होत असते. बघितलं, शरीराच्या तंदुरूस्तीसाठी घेतली जाणारी प्रोटीन पावडर हानीकारक ठरु शकते.

 

 

प्रोटीन पावडर घेताना हे पाहा

आरोग्याची हेळसांड थांबवायची असेल तर प्रोटीन पावडर घेताना थोडी जागरूकता ठेवावी लागेल.

1) सर्व प्रोटीन पावडरी सर्वांसाठी नसतात. तेव्हा योग्य वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर्स यांच्याकडून तुमच्या तब्येतीची तपासणी करु न त्यांनी नमूद केलेल्याच प्रोटीन पावडरीला प्राधान्य द्या. केवळ एकानं घेतली म्हणून मी पण घेऊन पाहिली असं करु नका.

2) प्रोटीन पावडरींमधील घटकांनुसार अनेक प्रकार असतात. तुमच्या शरीरासाठी कोणतं प्रोटीन गरजेचं आहे हे लक्षात घेऊनच प्रोटीन पावडरीची निवड करा.

3) प्रोटीन पावडर घेताना त्यात कमीत कमी 1 ते पाच ग्रॅम फॅट्स, 20 ते 30 टक्क्यांपर्यंत प्रत्येक सर्व्हिंगमध्ये येईल असे प्रोटीन आणि 1 ते 5 टक्के कार्बोहायड्रेट्स आहेत की नाही याची शहानिशा करु न घ्या.

4) प्रोटीन पावडर खरेदी करताना जाहिरातींमधील भुलथापांना बळी पडू नका.
बाजारात विविध प्रोटीन पावडरींचा तुलनात्मक अभयास करा आणि मगच योग्य प्रोटीन पावडर निवडा.

Web Title: Protein Powder. Are you take it blindly? It's dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.