हिवाळ्यासाठी पौष्टिक ठरते बदाम आणि तिळाची चिक्की!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 08:07 PM2019-01-18T20:07:28+5:302019-01-18T20:09:38+5:30
थंडीमध्ये तीळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे अनेकदा आहारातही तीळाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. कारण तीळ निसर्गतः उष्ण असतात.
थंडीमध्ये तीळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे अनेकदा आहारातही तीळाचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. कारण तीळ निसर्गतः उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी तीळ फायदेशीर ठरतात. अनेकदा घरामध्ये तिळकूट किंवा तिळाचे लाडू तयार करण्यात येतात. अनेकदा तर हे पदार्थ बाहेरून विकत आणले जातात. पण त्याऐवजी तुम्ही हे पदार्थ घरच्या घरीच अगदी कमी वेळात तयार करू शकता. जाणून घेऊया बदाम आणि तिळाची चिक्की तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
साहित्य :
- अर्धा कप काळे तीळ
- अर्धा कप बारिक केलेला गुळ
- अर्धा कप बारिक कापलेले बदाम
- दोन चमचे तूप
कृती :
- घरच्या घरी रेसिपी करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन मंद आचेवर गरम करत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये काळे तीळ भाजून घ्या.
- तीळ भाजल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. त्यानंतर बदामाचे तुकडे भाजून घ्या.
- एका पसरट प्लेटला तूप लावून घ्या.
- त्यानंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गुळ वितळवून घ्या.
- आता तयार मिश्रणामध्ये तीळ आणि बदामाचे तुकडे टाकून एकत्र करून घ्या.
- तयार मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये सेट करून घ्या.
- काही वेळ मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर काही वेळाने त्याच्या वड्या पाडून घ्या.
- बदाम आणि तीळाची चिक्की खाण्यासाठी तयार आहे.