गरमा-गरम, खमंग अशी चन पापडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 01:16 PM2019-08-06T13:16:23+5:302019-08-06T13:24:59+5:30
पावसाळ्यात अनेकदा बेसन वापरून तयार केलेले आणि खमंग तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकदा घरामध्ये सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भजी तयार केल्या जातात. पण तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.
पावसाळ्यात अनेकदा बेसन वापरून तयार केलेले आणि खमंग तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकदा घरामध्ये सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भजी तयार केल्या जातात. पण तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तसेच या वातावरणामध्ये बॅक्टेरियांची भितीही फार असते. त्यामुळे स्ट्रिट फूडपासून दूर राहण्याचा सल्ला अनेकदा आपल्याला देण्यात येतो. अशातच तुम्ही घरात अगदी सोप्य पद्धतीने हटके पदार्थ तयार करू शकता.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका हटके पदार्थांची रेसिपी सांगणार आहोत. त्याचं नाव आहे चन पापडी. तुम्हीही पावसाळ्यात हा हटके पदार्थ तयार करू शकता.
साहित्य :
- 1 मोठी वाटी बेसन
- 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ
- पाव चमचा ओवा
- अर्धा चमचा लाल मिरची पावडर
- पाव चमचा हळद
- 1 चमचा धणा-जिरा पावडर
- 1 चमचा पांढरे तीळ
- तांदळाचे पीठ
- तेल व मीठ
कृती :
- परातीमध्ये बेसन, गव्हाचं पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, पांढरे तीळ, मीठ, तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
- 15 मिनिटं सेट करायला ठेवून द्या. आता पोळपाटावर तांदळाचं पीठ टाकून मिश्रणाची पोळी लाटून घ्या.
- वाटीच्या साहाय्याने पुऱ्या तयार करून घ्या. नंतर पुरीला काट्याच्या साहाय्याने टोचे मारून घ्या.
- कढईमध्ये तेल गरम करून चन पापडी तळून घ्या. याचे आकार मुलांच्या आवडीनुसार दिले तरी चालतील.
- तुषार प्रीती देशमुख (लेखक प्रसिद्ध शेफ आहेत.)