रोजच्याच त्याच त्याच पदार्थांना कंटाळलाय? मग ट्राय करा खमंग आणि खुसखुशीत दही टिक्की!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 06:08 PM2018-09-01T18:08:02+5:302018-09-01T18:10:11+5:30
रोज सकाळी मुलांच्या शाळा किंवा घरातील ऑफिसला जाणाऱ्यांच्या जेवणाच्या डब्ब्याच्या तयारीमध्ये नाश्ता तयार करणं राहून जातं. बऱ्याचदा डब्यामध्ये देण्यात येणारे पदार्थच नाश्ता म्हणून दिले जातात.
रोज सकाळी मुलांच्या शाळा किंवा घरातील ऑफिसला जाणाऱ्यांच्या जेवणाच्या डब्ब्याच्या तयारीमध्ये नाश्ता तयार करणं राहून जातं. बऱ्याचदा डब्यामध्ये देण्यात येणारे पदार्थच नाश्ता म्हणून दिले जातात. नाहीतर मग रोजचेच आणि झटपट होणारे पोहे आणि उपमा यांचा बेत आखण्यात येतो. पण घरातली मंडळी रोजच्याच त्या पदार्थांना वैतागतात. अशावेळी सहज तयार करता येणारी आणि चवदार अशी दही टिक्की तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जाणून घेऊयात दही टिक्की तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती...
साहित्य :
- दीड कप दही
- अर्धा कप डाळीचं पीठ (बेसन)
- पाव चमचा मीठ
- पाव चमचा तिखट
- अर्ध्या नारळाचं खवलेलं खोबरं
- वाटीभर वाफवलेले वाटाणे
- सुका मेवा (बारिक केलेला)
- एक चमचा किसलेलं आलं
- दोन हिरव्या मिरच्या वाटलेल्या
- चिरलेली कोथिंबीर
- एक चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा लिंबाचा रस
- अर्धा चमचा तिखट
- मीठ (चवीनुसार)
कृती :
- सर्वात आधी खवलेलं खोबरं खरपूस भाजून घ्यायचं.
- त्यानंतर एका बाउलमध्ये वाफलेले वाटाणे कुस्करून घ्या.
- त्यामध्ये सुका मेवा, कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस, तिखट घालून सारण तयार करून घ्यावं.
- दरम्यान दही पातळ कपडयामध्ये बांधून चक्क्याप्रमाणे त्यातील पाणी काढून घ्या.
- दोन तासांनी पाणी निथळल्यावर त्यात तिखट, मीठ, बेसन घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
- तयार पीठाचे गोळे करून त्यामध्ये सारण भरावं आणि चपटा गोलाकार आकार द्यावा.
- गॅसवर तवा ठेवून तापल्यावर थोडं तेल टाकावं.
- तयार केलेल्या टिक्की खरपूस तव्यावर भाजून घ्याव्यात.
- गरमागरम खमंग दही टिक्की सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.