असा तयार करा चटपटीत दही वडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 06:49 PM2018-11-13T18:49:53+5:302018-11-13T18:51:42+5:30
दही वडा एक चविष्ट भारतीय पदार्थ आहे. अनेकदा हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेल्यावर या पदार्थाला पहिली पसंती देण्यात येते. पण हा पदार्थ घरच्या घरी उपलब्ध साहित्यांच्या मदतीने अगदी सहज तयार करण्यात येतो.
दही वडा एक चविष्ट भारतीय पदार्थ आहे. अनेकदा हॉटेलमध्ये खाण्यासाठी गेल्यावर या पदार्थाला पहिली पसंती देण्यात येते. पण हा पदार्थ घरच्या घरी उपलब्ध साहित्यांच्या मदतीने अगदी सहज तयार करण्यात येतो. मुळचा उत्तर भारतातील हा पदार्थ संपूर्ण भारतात चवीने खाल्ला जातो. घरी अचानक पाहुणे आले तरीदेखील चटकन करता येण्यासारखा पदार्थ तुम्ही एकदा तरी ट्राय केला पाहिजे...
साहित्य :
- अर्धी वाटी उडदाची डाळ
- पाव वाटी मुगाची डाळ
- 1/4 वाटी ओल्या खोबर्याचे पातळ तुकडे
- चवीपुरते मीठ
- 2 वाटी पातळ ताक
- तळण्यासाठी तेल
- दीड वाटी घट्ट दही
- 5-6 टेस्पून साखर
- मिरपूड
- लाल तिखट
- चाट मसाला
- कोथिंबीर
कृती :
- उडिद डाळ आणि मुगाची डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी.
- त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे.
- पाणी न घालता दोन्ही डाळी एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात.
- वाटलेले मिश्रण थोडंस जाडसरचं ठेवा. नंतर त्यात मीठ आणि खोबर्याचे पातळ काप घालावेत.
- कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर गोल आकारात वडे तळून घ्या.
- पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवा.
- तोपर्यंत दही तयार करा. भांड्यामध्ये घट्ट दही घ्या. त्यामध्ये थोडसं पाणी घालून आवश्यक तेवढे पातळ करून घ्या. त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- ताकात ठेवलेले वडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यावर दही घालून वरती थोडी मिरची पावडर, चाट मसाला, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.