झणझणीत, तर्रीबाज कोल्हापूरची ठसकेदार मिसळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:57 PM2018-10-23T17:57:25+5:302018-10-23T17:57:58+5:30
प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्य संस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ.
प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते. आता खाद्यसंस्कृतीचंच पाहा ना... प्रत्येक देश, राज्य आणि इतकचं नाही तर शहरागणिकही खाद्यसंस्कृतीमध्ये फरक दिसून येतो. असंच काहीसं मिसळीच्याबाबतीत आढळून येतं. मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ. पण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये हिची वेगळी चव चाखायला मिळते. पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ, नाशिकची मिसळ यांसारख्या अनेक शहरांमध्ये मिसळींची वेगळी चव चाखायला मिळते. पण त्यातल्यात्यात आपला झणझणीतपणा आणि तर्रीबाज ठसक्यासाठी ओळखली जाणारी मिसळ म्हणजे कोल्हापूरी मिसळ. पण ही मिसळ खाण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर गाठायची अजिबात गरज नाही. तुम्ही घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने कोल्हापूरी मिसळ तयार करू शकता. जाणून घेऊया कोल्हापूरी मिसळ तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- 4 कप मोड आलेली मटकी
- मीठ चवीनुसार
- 2 चमचे गरम मसाला
- 2 चमचे हळद
- 1 चमचा आल्याची पेस्ट
- जीरं
- मोहरी
- 1 ½ कांदा
- 4 कप पाणी
- 2 चमचे धने पावडर
- 4 चमचे लाल मिरची पावडर
- 2 टोमॅटो
- तेल
- 1 कप शेव
- बारिक चिरलेली कोथिंबीर
- मिसळसोबत खाण्यासाठी पाव
कृती :
- सर्वात आधी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- एक कढई मंद आचेवर गरम करत ठेवा. त्यामध्ये 2 चमचे तेल ओता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जीरं आणि मोहरी टाका. थोडं तडतडल्यावर त्यामध्ये बारिक चिरलेला कांदा, हळद टाकून हे मिश्रण मंद आचेवर परतून घ्या.
- या मिश्रणामध्ये मोड आलेली मटकी आणि आलं लसणाची पेस्ट टाका. मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये धने पावडर, गरम मसाला, मिरची पावडर आणि टॉमेटो पेस्ट टाका आणि परतून घ्या. आता यामध्ये 4 कप पाणी टाका आणि मटकी शिजेपर्यंत शिजवून घ्या.
- मिश्रण एकत्र झाल्यानंतर एक उकळी येऊ द्या. मिसळ तयार आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि शेव टाकून पावासोबत सर्व्ह करा झणझणीत तर्रीबाज कोल्हापूरी मिसळ.