'हा' मेथी राईस एकदा खाल; तर पुन्हा पुन्हा मागाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:36 PM2019-03-13T16:36:33+5:302019-03-13T16:37:47+5:30
आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो.
आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही. हे सर्व खरं असलं तरीही धावपळीच्या दैनंदिन जीवनात आरोग्य चांगलं राखण्यासाठी डॉक्टरांकडूनही अनेकदा हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देण्यात येतो. अशातच अनेकदा बाजारामध्ये मेथी सर्रास दिसून येते. त्यातल्यात्यात हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराचं अनेक आजारांपासून बचाव होतो.
पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी तत्त्व आढळून येतात. मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. याचे शरीरालादेखील अनेक फायदे होतात. पण घरी एकाच पद्धतीने तयार केली जाणारी मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो. अशातच तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण मेथीच वापरून एखादा नवीन पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही नवीन हटके रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घेऊया मेथी भात तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- एक कप बासमती तांदूळ
- एक कप चिरलेली मेथी
- बारीक चिरलेल्या हिरवी मिरची
- लाल तिखट
- धणा पावडर
- आमचूर पावडर
- दालचिनी
- लवंग
- मीठ
- तेल
- पाणी
कृती :
- तांदूळ थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
- कढईत तेल घालून त्यावर दालचिनी, लवंग, हिरव्या मिरचीची फोडणी द्यावी.
- त्यानंतर चिरलेली मेथी त्यावर घालावी. वरून लाल तिखट, धणा पावडर, आमचूर पावडर, मीठ घालून चांगले परतून घ्यावे.
- त्यावर तांदूळ पसरावा. तांदळाच्या दीडपट पाणी घालावे, चवीनुसार मीठ घालावे आणि तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यावा.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये मटार किंवा काजूचे तुकडेही वापरू शकता.
- गरमा गरम मेथी राईस खाण्यासाठी तयार आहे.