झटपट तयार होणारा आरोग्यदायी कच्च्या हळदीचा हलवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 08:20 PM2018-12-17T20:20:23+5:302018-12-17T20:21:55+5:30
कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते.
कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यासाठी आवश्यक ते गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कच्ची हळद गरम दूधामध्ये एकत्र करून प्यायल्याने सर्दी, खोकला यांसारखे आजार दूर होतात. अशा आरोग्यदायी हळदीपासून तयार करण्यात आलेला हलवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
साहित्य :
- हळद 250 ग्रॅम
- गुळ 500 ग्रॅम
- खारका 500 ग्रॅम
- दूध अर्धा लीटर
- काजू
- मनुके
- बदाम
- तूप
- वेलची पूड
कृती :
- खारका धुवून त्या पाण्यामध्ये 6 ते 7 तासांसाठी ठेवून द्या.
- हळदीची व्यवस्थित साल काढा आणि धुवून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या
- हळदीच्या पेस्टमध्ये खारका एकत्र करून पुन्हा बारिक करून घ्या.
- पेस्ट तयार करताना ज्या पाण्यामध्ये खारका भिजत ठेवल्या होत्या त्या पाण्याचा वापर करा.
- हळदीची पेस्ट कडईमध्ये टाकून मंद आचेवर शिजवून घ्या.
- त्यामध्ये तूप टाकून हळदीची पेस्ट व्यवस्थित शिजवून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये दूध टाकून मिश्रण शिजवून घ्या.
- दूध मिश्रणामध्ये व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये खारका टाकून मिश्रण कोरडं होऊ द्या.
- मिश्रण सुकल्यानंतर त्यामध्ये गुळ, काजू, मनुके एकत्र करा.
- थोडा वेळ गॅस बंद करून त्यामध्ये बदाम आणि वेलची पूड एकत्र करा.
- गरमा गरम आरोग्यदायी असा हळदीचा हलवा तयार आहे.
- हलवा जेवढा कोरडा होईल तितके दिवस खराब होणार नाही.
- साधारणतः 10 दिवसांपर्यंत हा हलवा खराब होत नाही.
- हलवा तयार करण्यासाठी तुम्ही खवाही एकत्र करू शकता.