खान्देशी स्टाइल वांग्याचं भरीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:36 PM2019-01-29T15:36:53+5:302019-01-29T15:40:32+5:30
हिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढली आहे. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचं भरीत.
हिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढली आहे. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचं भरीत. गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपीबाबत...
साहित्य :
- हिरव्या रंगाची जळगावी चार वांगी
- टोमॅटो एक
- कांदे दोन मोठे
- हिरव्या मिरच्या 10 ते 12
- लसणाच्या पाकळ्या आठ
- कांद्याची पात
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- हिंग
- मोहरी
- तेल
कृती :
- वांगी तेल लावून गॅसवर भाजा.
- त्यानंतर गार पाण्याखाली धुवून साल काढून घ्यावी.
- सुरीने गर कापून घ्यावा.
- या गरात मीठ, कांदे, मिरच्या, कांद्याची पात, टोमॅटो, बारीक चिरुन घालावं. कोथिंबीर घालावी.
- सर्व पदार्थ चमच्याने कालवून घ्या.
- वरुन तेलाची, हिंग-मोहरीची फोडणी द्या.
- गरमा गरम खान्देशी वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे.