तेजतर्रार खान्देशी शेवभाजी करून तर बघा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 04:25 PM2019-11-21T16:25:15+5:302019-11-21T16:31:58+5:30
दालबाटी, शेवभाजी, वांग्याचे भरीत असे काही पदार्थ खान्देशाची ओळख आहे. चला तर बघूया, या शेवभाजीची रेसिपी.
पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक भागाला स्वतःची अशी चव आहे. तिथे येणारी पिके, मसाले आणि स्वयंपाकाची पद्धत एक वेगळा दर्जा राखून आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे खान्देश. दालबाटी, शेवभाजी, वांग्याचे भरीत असे काही पदार्थ खान्देशाची ओळख आहे. चला तर बघूया, या शेवभाजीची रेसिपी. अचानक पाहुणे आले किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर या शेवभाजीला तोड नाही.
साहित्य :
जाड शेव दोन वाटी
एक मोठा कांदा
पाव वाटी खोबऱ्याचा किस
पाच ते सहा लवंगा
पाच ते सहा मिरे
तमालपत्र २
लाल तिखट एक ते दीड चमचा
हळद अर्धा चमचा
५ ते सहा पाकळ्या लसूण
अर्धा इंच आल्याचा तुकडा
धणे पावडर
मीठ
तेल
पाणी
कोथिंबीर
कृती :
- कढईत चमचाभर तेल घालून कांदा परतवून घ्या. त्यात खोबऱ्याचे काप, आलं, लसूण, लवंगा, तमालपत्र आणि मिरे घालून भाजून घ्या.
- हा सर्व मसाला खरपूस भाजून थंड करून मिक्सरमध्ये बारीक करा.
- कढईत जरा जास्त तेल घेऊन मोहरी तडतडून घ्या. त्यात तयार मसाला छान वास सुटेपर्यंत गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्या.
- आता त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून एकत्र करा. या मसाल्याच्या वाटणात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चार वाट्या पाणी घाला.
- पाण्याला उकळी आल्यावर त्यात शेव घालून गॅस बंद करा. आता गरमागरम शेवभाजी सर्व्ह करा. ही भाजी पोळी, भाकरी, ब्रेड, रोटीसोबत उत्तम लागते.
टीप : आधीच शेव घालून भाजी ठेऊ नये. प्रत्यक्ष सर्व्ह करण्याआधी रस्सा गरम करून त्यात शेव घालावी.