Recipe For Ganesh Festival : थोडेसे वेगळे आणि करायला सोपे रव्याचे मोदक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 12:42 PM2019-09-08T12:42:14+5:302019-09-08T12:43:41+5:30
अनेकदा नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण अनेकदा या पदार्थांमध्ये भेसळ असते. अशा पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही घरीच पदार्थ तयार करणं केव्हाही उत्तमच...
सध्या गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू असून बाप्पाच्या आगमनाने चोहीकडे प्रसन्नतेचे वातावरण आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी घराघरांत गोड पदार्थांचा घाट घातला असेलच. पण अनेकदा नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण अनेकदा या पदार्थांमध्ये भेसळ असते. अशा पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही घरीच पदार्थ तयार करणं केव्हाही उत्तमच... आज आम्ही तुम्हाला एक वेगळी रेसिपी सांगणार आहोत. आपण बाप्पासाठी चॉकलेट्स मोदक, तीळाचे मोदक तयार करतो पण त्याहीपेक्षा वेगळे आणि खाण्यास चवदार असे रवा मोदक तुम्ही झटपट तयार करू शकता. जाणून घेऊया रवा मोदक तयार करण्याची रेसिपी...
साहित्य :
- रवा
- गुळ
- वेलची पावडर
- किसलेलं खोबरं
- तूप
- आवश्यकतेनुसार पाणी
कृती :
- मंद आचेवर पॅन ठेवून त्यावर किसलेलं खोबरं आणि गूळ परतून घ्या.
- मिश्रण एकजीव होइपर्यंत सतत ढवळत राहावं.
- तयार मिश्रणात वेलची पावडर एकत्र करून सहा ते सात मिनिटांसाठी मिश्रण शिजवून घ्यावं.
- तयार सारण थंड करून घ्यावं.
- मोदकांचं बाह्य आवरण तयार करण्यासाठी सर्वात आधी रवा भाजून घ्यावा.
- रव्याचा रंग गुलावी झाल्यानंतर गॅस बंद करून प्लेटमझ्ये काढून घ्या.
- एका पॅनमध्ये थोडं पाणी आणि दूध गरम करून त्यामध्ये तूप एकत्र करा.
- दूध उकळल्यानंतर त्यात भाजलेला रवा एकत्र करा आणि मिश्रण सतत ढवळत राहा.
- मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून ते प्लेटमध्ये काढून घ्या.
- रव्याचं मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- त्यानंतर पारी करून त्यामध्ये गुळ खोबऱ्याचं सारण भरून मोदक तयार करा.