चटपटीत चायनिज शेजवान सॉस!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:18 PM2018-11-19T14:18:08+5:302018-11-19T19:34:57+5:30
चायनिज म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. ऐकल्या ऐकल्याच तोंडाला पाणी सुटतं. पण चायनिज पदार्थांपेक्षा जीभेला चटक लागते ती शेजवान सॉसची. अनेकजण तर या सॉसच्या ओढीने चायनिज खायला जातात.
चायनिज म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. ऐकल्या ऐकल्याच तोंडाला पाणी सुटतं. पण चायनिज पदार्थांपेक्षा जीभेला चटक लागते ती शेजवान सॉसची. अनेकजण तर या सॉसच्या ओढीने चायनिज खायला जातात. तुम्हाला माहीत आहे का? हा सॉस तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला शेजवान सॉस घरी तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही हा सॉस तयार करून आरामात एक ते दोन आठवड्यांसाठी फ्रिजमध्ये ठेवून खाऊ शकता. घरी तयार केलेला हा शेजवान सॉस कटलेट, मोमोज, पराठे किंवा प्राइड राइससोबत सर्व्ह करू शकता.
साहित्य :
- वाळलेल्या लाल मिरच्या - 1 कप
- तेल- 1/3 कप
- लसणाची पेस्ट - 4 चमचे
- आल्याची पेस्ट - 3 चमचे
- सोया सॉस- 1 चमचा
- टॉमेटो सॉस - 3 चमचे
- साखर - 1/4 चमचा
- मीठ चवीनुसार
कृती :
- सर्वात आधी आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्या.
- एक कप पाण्यात लाल मिरच्यांच्या बिया काढून उकळून घ्या.
- मिरच्या टाकलेल्या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि 5 मिनिटापर्यंत उकळून घ्या.
- त्यानंतर पाणी गाळून मिरच्यांना हलक्या हाताने वाटून घ्या.
- आता एक पॅनामध्ये तेल गरम करा, त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर मिरच्यांची पेस्ट, सोसा सॉस, टोमॅटो सॉस, साखर आणि मीठ घालून मिक्स करा.
- मध्यम आचेवर ठेवून सॉस शिजवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा.
- तयार शेजवान सॉस थंड करून फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. हा सॉस किमान 2 आठवड्यापर्यंत राहू शकतो.