कुरडयांची रसरशीत भाजी पाहून तुम्हाला भूक आवरणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 07:08 PM2018-08-21T19:08:19+5:302018-08-21T19:10:26+5:30
जेवणासोबत पापड असेल तर त्याची मजा काही औरचं असते. पापडाप्रमाणेच कुरकुरीत कुरडयाही जेवताना खाणं अनेकांना आवडतं. प्रामुख्याने कुरडया तळून खाल्ल्या जातात.
जेवणासोबत पापड असेल तर त्याची मजा काही औरचं असते. पापडाप्रमाणेच कुरकुरीत कुरडयाही जेवताना खाणं अनेकांना आवडतं. प्रामुख्याने कुरडया तळून खाल्ल्या जातात. या गव्हाच्या चिकापासून किंवा तांदळापासून तयार करण्यात येतात. पण कुरडयांची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? कुरकुरीत कुरडयांची रसरशीत भाजी तुम्हाला नक्की आवडेल. जाणून घेऊयात कुरडयांची भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती...
साहित्य :
- 4 कुरडया किंवा चुरा
- 1 बारिक चिरलेला कांदा
- 7 ते 8 कढीपत्याची पानं
- 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या
- पाव चमचा हिंग
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा मोहरी-जिरे
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा कांदा लसूण मसाला
कृती :
सर्वात आधी कुरडयांचा चुरा करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्या वाफवून घ्या.
गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घाला.
मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं-हिंगांची फोडणी देऊन लसून घाला.
साधारणतः मिनिटभर सगळं परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि बारिक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
कुरडईमधलं पाणी काढून घ्या. आणि थोडा वेळ ताटामध्ये ठेवा. त्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल.
कांद्याला हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर त्यामध्ये कांदा-लसूण मसाला घाला. त्याऐवजी गोडा किंवा वऱ्हाडी मसालाही वापरू शकता.
सर्व मिश्रण मिनीटभर परतून घेऊन त्यावर गाळून घेतलेल्या कुरड्या घालून त्यावर चवीनुसार मीठ घाला.
पुन्हा सर्व व्यवस्थित मिसळून घेऊन त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर कुरडई भाजी चार-पाच मिनिटे व्यवस्थित वाफ येऊ द्यावी.
झाकण काढून पुन्हा भाजी परतून घ्यावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवावी.
कुरडयांची रशरशीत भाजी खाण्यासाठी तयार आहे.