खान्देशची शान असलेले वांग्याचे भरीत नक्की करा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:32 PM2018-12-26T17:32:37+5:302018-12-26T17:36:26+5:30
गरेदार वांगे,शेंगदाण्याचा स्वाद त्याला कांद्याच्या पातीची साथ आणि त्याला कांदा लसणाची फोडणी असलेले हे भरीत किती खाऊ आणि किती नको असे होते.
पुणे : खान्देश म्हटलं की डोळ्यासमोर येत ते वांग्याचं भरीत ! गरेदार वांगे,शेंगदाण्याचा स्वाद त्याला कांद्याच्या पातीची साथ आणि त्याला कांदा लसणाची फोडणी असलेले हे भरीत किती खाऊ आणि किती नको असे होते. गरमागरम भाकरी, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा आणि बुक्कीने फोडलेला कांदा असा बेत म्हणजे आयुष्य सार्थकी लागल्याची भावनाचं ! तेव्हा जिभेला तृप्त करणारे हे भरीत नक्की करून बघा.
साहित्य :
जळगावी वांगी किंवा भरताची जांभळी वांगी वापरावी
लसूण पात किंवा लसणाच्या दहा ते बारा मोठ्या पाकळ्या
कांद्याची पात
मध्यम चौकोनी चिरलेला कांदा
मिरच्या आठ ते दहा
शेंगदाणे पाव वाटी
तेल
मोहरी
मीठ
कोथिंबीर
कृती :
वांग्यांना तेल लावून गॅसवर भाजून घ्या.
वांगं व्यवस्थित सर्व बाजूंनी काळ्या रंगाचे भाजल्यावर ते ताटात घेऊन त्यावर १५ मिनिटे कढई किंवा पातेले झाकून ठेवावे. यामुळे साल सहज निघते.
वांगं गार झाल्यावर त्याची साल काढून आणि देठ काढावा.
वांग्याचा गर एक पातेल्यात घेऊन त्यात थोडेसे मीठ घालून एकजीव करावा.
हीच कृती खलबत्त्यात किंवा लाकडी बडगी घालून केल्यास भरीत अधिक चवदार होते.
दुसरीकडे कढईत थोड्याशा तेलात सात ते आठ मिरच्या परतवून घ्याव्यात. मिरच्या हलक्या परताव्यात, रंग बदलू नये.
या मिरच्या काढून त्यात लसूण हलका परतावा.
याच तेलात शेंगदाणे घालून तळून घ्यावेत.
एका मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, लसूण एक ते दोनवेळा फिरवून घ्यावे. अगदी बारीक करू नये.
आता कढईत पुन्हा तेल कडकडीत तापवून मोहरी टाकावी.
मोहरी तडतडल्यावर मिरची, लसणाचे वाटण घालावे.
त्यात चिरलेला कांदा घालावा.
कांदा अर्धवट परतावा, गुलाबी करू नये.
यात बारीक चिरलेली कांद्याची व लसणाची पात घालावी आणि लगेचच वांगे घालावे.
यात आता शेंगदाणे घालून भरीत एकसारखे करावे.
या भरतात चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
हे भरीत कुठलीही भाकरी किंवा पोळीसोबत भन्नाट लागते.