स्वस्तात मस्त आणि चवीला जबरदस्त ; असे बनवा भन्नाट मँगो आईस्क्रीम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 05:38 PM2019-05-08T17:38:32+5:302019-05-08T17:42:29+5:30
घरच्या घरी करायला सोपे आणि चवीला भन्नाट अशा मँगो अर्थात आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तेव्हा हे आईस्क्रीम करा आणि उन्हाळा अधिक गोड बनवा.
Next
पुणे : रणरणत्या उन्हात आईस्क्रीम खायची इच्छा तर सगळ्यांना होते. पण अनेकदा त्यामुळे त्रास होण्याचे प्रसंगही उद्भताना दिसून आले आहेत. विशेषतः आईस्क्रीम जुने आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून बनवले असेल तर उलट्या, जुलाब, मळमळ, घसा बसणे अशी अनेक दुखणी उद्भवतात. पण आता त्याची चिंता नको. कारण घरच्या घरी करायला सोपे आणि चवीला भन्नाट अशा मँगो अर्थात आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तेव्हा हे आईस्क्रीम करा आणि उन्हाळा अधिक गोड बनवा.
साहित्य :
- एक कप आंब्याचा रस ( रस हापूसचाच हवा असं काही नाही, फक्त घट्ट हवा. )
- एक कप मिल्क पावडर,
- एक कप दूध (निरसं म्हणजेच न तापवलेलं )
- एक कप साय (बाजारात मिळणारं क्रीमही वापरू शकता.
- तीन ते चार टेबलस्पून पीठीसाखर,
- वाटीभर आंब्याच्या बारीक फोडी
- कृती -
- आंब्याच्या बारीक फोडी वगळता सगळे पदार्थ मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्या.
- आइस्क्रीम किती गोड हवं त्यानुसार पीठीसाखर घाला.
- तयार झालेलं घट्टसर द्रावण प्लॅस्टिकच्या पसरट डब्यात ओतून घ्या.
- डब्याचं झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवा. झाकण असणं आवश्यक आहे.
- पहिल्यांदा आइस्क्रीम सेट करताना फ्रीजरचा थंडावा मॅक्सिममवर ठेवा. आइस्क्रीम सेट झालं की, थोडा वेळ बाहेर काढून ठेवा. ते थोडं वितळू द्या. मग त्याचे चमच्याने तुकडे करा आणि ते अर्धवट वितळलेलं आइस्क्रीम स्मूथ होईस्तोवर मिक्सरमधून फिरवून घ्या. यामुळे आइस्क्रीममधे तयार झालेले क्रिस्टल मोडून पडतात.
- पुन्हा सेट करण्यासाठी कंटेनरमध्ये ओता. त्यात आंब्याच्या बारीक फोडी नीट मिसळा. आता आइस्क्रीम पुन्हा सेट करण्यासाठी ठेवताना मात्र फ्रीजरचा थंडावा मॅक्सिममवर ठेवू नका, तर त्यापेक्षा थोडा कमीवर ठेवा, ज्यामुळे स्मूथ टेक्श्चर न बिघडता आइस्क्रीम सेट होतं.
- आणि एन्जॉय करा मँगो आईस्क्रिम.