तुम्ही वाल भाताचा आस्वाद घेतलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:26 PM2019-03-12T18:26:14+5:302019-03-12T18:27:17+5:30
कडधान्य म्हणून आपल्या सर्वांना ठाउक असणारा वाल आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. अनेकदा घरामध्ये वालाची उसळ किंवा भाजी करण्यात येते. वालाच्या उसळीला अनेक ठिकाणी बिरड्याची उसळ असंही म्हणतात.
कडधान्य म्हणून आपल्या सर्वांना ठाउक असणारा वाल आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. अनेकदा घरामध्ये वालाची उसळ किंवा भाजी करण्यात येते. वालाच्या उसळीला अनेक ठिकाणी बिरड्याची उसळ असंही म्हणतात. वाल रात्री गरम पाण्यामध्ये भिजवून एका कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवले जातात. मोड आल्यानंतर त्यांच्यापासून तटपटीत उसळ किंवा भाजी तयार करण्यात येते. गरोदरपणानंतर महिलांना वालापासून तयार करण्यात येणारे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. असा बहुगुणी वालाचा तुम्हीही आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही रोजचीच वालाची उसळ आणि भाजी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला वालापासून तयार करण्यात येणाऱ्या भाताची रेसिपी सांगणार आहोत.
जाणून घेऊया वाल भात तयार करण्याची रेसिपी :
साहित्य :
2 वाट्या बासमती तांदूळ, 1 वाटी मोड आलेले वाल, 1 कांदा, 1 बटाटा, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, आलं, लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा गरम मसाला, गूळ, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 4 ते 5 लवंगा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, दीड चमचा तिखट, चवीनुसार मीठ.
कृती :
- वाल 8 ते 9 तास पाण्यात भिजत घालून मोड आणून घ्यावेत.
- आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात. धने, जिरे, लवंग, दालचिनी थोडे भाजून घेऊन त्याची पूड करावी.
- तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यावर डाळिंब्या टाकाव्यात.
- बटाट्याच्या मोठ्या फोडी करून त्या परताव्यात. चवीनुसार मीठ घालावे.
- झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. तांदूळ घालून एकसारखे ढवळून अडीचपट उकळीचे पाणी घालावे. वाफ आणून भात शिजवून घ्यावा.
- गरमा गरम वालाचा भात खाण्यासाठी तयार आहे.