जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 10:00 PM2022-07-05T22:00:21+5:302022-07-05T22:21:37+5:30

भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांदूळ शिजवण्याची एक खास पद्धत शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीचं अनुकरण केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

right way to cook rice | जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

जाणून घ्या भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर

googlenewsNext

निरोगी आयुष्यासाठी घरात तयार केलेल्या पदार्थांचं सेवन करायला हवं, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमी देतात. अन्नपदार्थांतून मिळणारी पोषक द्रव्यं (Nutrients) नाहीशी होऊ नयेत म्हणून काळजी घेणं गरजेचं असतं. भारतीय आहारातला प्रमुख घटक म्हणजे भात. भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांदूळ शिजवण्याची एक खास पद्धत शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीचं अनुकरण केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. ‘बोल्ड स्काय हिंदी’ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रत्येक भारतीय कुटुंबात वरण, पोळी, भाजी, भात या अन्नपदार्थांचा हमखास समावेश असतो. भाताशिवाय आपलं जेवण पूर्ण होऊच शकत नाही. परंतु मधुमेह (Diabetes) असणाऱ्या किंवा स्थूल व्यक्तींना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. चुकीच्या पद्धतीने भात शिजवल्यास त्यातली पोषक द्रव्यं नष्ट होण्याची भीती असते. भात शिजवण्याची योग्य पद्धत शेफिल्ड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीला त्यांनी पीबीए अर्थात परबॉयलिंग विथ अ‍ॅब्सॉर्प्शन मेथड (PBA-Parboiling With Absorption Method) असं नाव दिलं आहे. ‘सायन्स ऑफ द टोटल इन्व्हायर्न्मेंट’मध्ये (Science Of The Total Environment) पीबीएबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, भात शिजवण्यापूर्वी सुरुवातीला तांदूळ 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. त्यामुळे त्यातला आर्सेनिक (Arsenic) हा घटक निघून जातो. त्यानंतर तांदळांमध्ये पाणी घालून मंद आचेवर ते शिजवायला ठेवावेत. तांदळांनी सगळं पाणी पूर्णत: शोषून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा. संशोधन असं सांगतं, की या पद्धतीने तांदूळ शिजवले तर ब्राउन राइसमधून 50 टक्क्यांपर्यंत आर्सेनिक निघून जाईल. सर्वसाधारण तांदळांतून तर 74 टक्क्यांपर्यंत आर्सेनिक निघून जातं.

आर्सेनिक म्हणजे नेमकं काय?
आर्सेनिक माती आणि पाण्यामध्ये आढळतं. इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत तांदळामध्ये आर्सेनिकचं प्रमाण जास्त असतं. कारण भातशेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर होत होतो. आर्सेनिक हे एक प्रकारचं रसायन आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कीटकनाशकांमध्ये याचा वापर केला जातो. उलटी, पोटदुखी, जुलाब किंवा कॅन्सरसाठी आर्सेनिक कारणीभूत ठरू शकतं.

पीबीए पद्धत फायद्याची
घरामध्ये अन्न शिजवताना पीबीए पद्धतीचा अवलंब केला, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. विशेषत: तांदूळ शिजवताना पीबीए पद्धतीचा वापर केल्यास आर्सेनिक घटक बाहेर निघून जातो आणि आजार होण्याचा धोकाही राहत नाही. पीबीए पद्धतीचा अवलंब केल्यामुळे तांदळातल्या स्टार्चचं प्रमाणही कमी होतं. यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता राहत नाही. स्टार्चचं प्रमाण कमी झाल्यास रक्तातल्या साखरेचं प्रमाणही वाढत नाही. अतिरिक्त स्टार्च निघून गेल्याने वजन कमी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीही अशा भाताचं सेवन करू शकतात. या पद्धतीने तांदूळ शिजवत असल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. भात खाल्ल्यानंतर लगेच न झोपता कमीत कमी दोन तासांनंतर झोपायला हवं. तसेच शक्य असल्यास जेवल्यावर शतपावली केली, तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

Web Title: right way to cook rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.