मुलांना नाश्ता म्हणून पास्ता देताय?; पण तो खरचं हेल्दी आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 05:40 PM2019-03-01T17:40:47+5:302019-03-01T17:41:16+5:30
अनेकदा आई-वडिलांसमोर एक मोठा प्रश्न असतो की, मुलांना पौष्टिक आहार द्यावा तर काय द्यावा? अनेकदा मुलं हे नको आणि ते नको असे हट्ट करत असतात.
अनेकदा आई-वडिलांसमोर एक मोठा प्रश्न असतो की, मुलांना पौष्टिक आहार द्यावा तर काय द्यावा? अनेकदा मुलं हे नको आणि ते नको असे हट्ट करत असतात. घरातील पौष्टिक पदार्थांऐवजी ते अनेकदा जंक फूड खाण्याची इच्छा पालकांसमोर व्यक्त करत असतात. अनेकदा शाळेतून आल्यानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यावेळी प्रत्येक पालकांसमोर हाच प्रश्न असतो की, मुलांना खाण्यासाठी काय द्यावं? यावेळी मुलं पिझ्झा किंवा पास्ता खाण्यासाठी हट्ट करतात. जाणून घेऊया, संध्याकाळच्या वेळी मुंलाना खाण्यासाठी पास्ता देणं योग्य ठरतं की अयोग्य...
(Image credit : shape.com)
इव्हिनिंग स्नॅक्स
संध्याकाळच्या वेळचा नाश्ता आपल्याला रात्रीच्या जेवणापर्यंत एनर्जी पुरविण्यासाठी मदत करतो. खासकरून वाढत्या वयाच्या मुलांसाठी हा नाश्ता अत्यंत आवश्यक असतो. यावेळी शरीरातील हार्मोन्समध्येही बदल होत असतात. त्यामुळे आरोग्यासोबतच मूड खूश ठेवण्यासाठीही मदत होते.
हेल्दी आहे का पास्ता?
अनेकांच्या मनात पास्ताबाबत शंका असते की, पास्ता आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो की नाही? यामागे दोन प्रमुख कारणं असतात. एक म्हणजे, तो हा आपला पारंपारिक पदार्थ नाही आणि दुसरी गोष्टी म्हणजे, हा पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करण्यात येतो. पण हल्ली बाजारामध्ये अनेक प्रकारचे पास्ता सहज उपलब्ध होतात. याआधी फक्त मैद्यापासून तयार करण्यात आलेला पास्त मिळत होता. तेच आता गव्हापासून तयार करण्यात आलेला पास्ताही सहज उपलब्ध होतो. अशातच जर तुमचं मूल सतत खाण्यासाठी पास्ता मागत असेल तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचा पास्ता देऊ शकता. यामध्ये फायबर, आयर्न, व्हिटॅमिन-बी आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. एक कप साधारण पास्तामध्ये 221 कॅलरी असतात. तसेच डायटरी फायबर आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. जे कालांतराने हृदयाशी संबंधित आजारांचं कारण बनतं. गव्हापासून तयार करण्यात आलेल्या एक कप पास्तामध्ये 174 कॅलरी असतात.
पास्तामध्ये असणारी पोषक तत्व
गव्हापासून तयार करण्यात आलेला पास्ता तयार करण्यासाठी पूर्ण गव्हाचा वापर करण्यात येतो. तर रिफाइंड किंवा रेग्युलर पास्ता तयार करण्यासाठी प्रोसेस्ड गव्हाचा वापर करण्यात येतो. 100 ग्रॅम गव्हापासून तयार करण्यात आलेल्या पास्तामध्ये 37 ग्राम कार्बोहायड्रेट, 6 ग्रॅम फायबर, 7.5 ग्रॅम प्रोटीन, 174 कॅलरी आणि 0.8 ग्रॅम फॅट्स असतात. तेच 100 ग्रॅम रिफाइंड पास्तामध्ये 43 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2.5 ग्रॅम फायबर, 8.1 ग्रॅम प्रोटीन, 221 कॅलरी आणि 1.3 ग्रॅम फॅट्स असतात. गव्हापासून तयार केलेल्या पास्तामध्ये शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पोषक तत्व असतात.
पास्त्यासोबत इतर पौष्टिक गोष्टींचा समावेश करू शकता
तुम्ही पास्ता हेल्दी आणखी हेल्दी करण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या एकत्र करू शकता. शिमला मिरची, कॉर्न यांसारख्या पौष्टिक भाज्यांचा समावेश करू शकता. त्यासाठी भाज्या उकडल्यानंतर पास्तासोबत फ्राय करा. त्याचबरोबर पनीर किंवा क्रिमही एकत्र करू शकता.