स्मोकी ताक

By admin | Published: April 4, 2017 06:35 PM2017-04-04T18:35:28+5:302017-04-04T18:35:28+5:30

हेडींग वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल ना! स्मोकींग करून धूर बाहेर सोडतात हे माहित होतं. पण चक्क प्यायचं ही काय भानगडं आहे बुवा! भानगडं काहीही नाही बॉस. कृती सोपी आहे.

Smoky Tak | स्मोकी ताक

स्मोकी ताक

Next

- भक्ती सोमण

उन्हाळ्यात ताक तर सर्वच पितात.
मीही पिते.
पण दोन दिवसांपूर्वी स्मोकी ताक प्यायले. त्या धुरकट चवीच्या ताकानं
मला घामेघूम करणाऱ्या भर दुपारी
रिलॅस्कड आणि टेस्टी फील दिला.

हेडींग वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल ना! स्मोकींग करून धूर बाहेर सोडतात हे माहित होतं. पण चक्क प्यायचं ही काय भानगडं आहे बुवा! भानगडं काहीही नाही बॉस. कृती सोपी आहे. जसं आपण बिर्याणी करताना तिला कोळशानं स्मोक देतो. तोच फ्लेवर आता काही ड्रींक्समध्येही दिला जातो.
ड्रींक्समध्ये, हे कसं शक्य आहे. असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. पण हे आता काही काही ड्रींक्समध्ये करता येणं अगदी सहज शक्य झालं आहे. मी याबद्दल बरेच दिवस ऐकून होते. म्हटलं चव तर घेऊन बघूू.
परवाच मी ते प्यायले. काय? तर ताक हो! तेही स्मोकी फ्लेवरचं म्हणजे स्मोकी ताक. मुंबईतल्या गिरगावात नाटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या साहित्य संघाबाहेर "ताक स्टेशन" नावाचं छोटसं दुकान आहे. ते दुकान चालवणाऱ्या प्रसाद वेदपाठकला ही कल्पना सुचली. ताक तर सगळेच विकतात. पण हे स्मोकी फ्लेवरचं ताक निव्वळ अफलातून. त्यासाठी प्रसादनं छोट्या वाटीत कोळसा घेतला. आजकाल एखादा पदार्थ वा कोळशासारखे तत्सम पदार्थ जाळण्यासाठी एक छोटं मशीन येतं. ते चालू करून पदार्थ हव्या त्या प्रमाणात भाजू वा जाळू शकतो. तर कोळशाला स्मोक देण्यासाठी प्रसादनं त्या मशीनचा उपयोग करत छोट्या वाटीत हा कोळसा जाळायला सुरूवात केली. ५ मिनीटांनी कोळसा जसा जळायला लागला तसा त्याने त्यावर ओवा टाकला. त्यातून धूर यायला सुरवात झाल्यावर त्याने लगेचच एक काचेचा ग्लास त्या वाटीवर ठेवून दिला. अवघ्या दोन मीनिटात त्या ग्लासात पूर्ण धूर गेला होता. मग त्या धूर गेलेल्या ग्लासात दुसऱ्या ग्लासात असलेलं ताक खालीवर केलं आणि लगेच प्यायला दिलं. ताकाच्या गोड चवीबरोबर कोळशाच्या चवीचा स्मोकी फ्लेवर आणि ओव्याचं कॉम्बिनेशन एकदम वेगळंच आणि मस्त लागत होतं. .
कोळशात स्मोक करताना ओव्याऐवजी हिंग किंवा जीरेही वापरता येऊ शकतं. लोकांना बदल म्हणून हे ताक प्यायला आवडतं असं प्रसादनं सांगितलं.
फक्त ताकच नाही तर प्रसाद म्हणतो की कोकम सरबत, लस्सी, पन्हं या ड्रींक्सवरही असा स्मोकी फ्लेवर देता येऊ शकतो.
आजची तरूणाई खाण्या-पिण्याचे विविध पर्याय ट्राय करत असते. त्यामुळे त्यांना आवडतील अशा अनेक थीम्स सध्या सुरू आहेत. मग हे असं ताक पिऊन बघा की!लागतं तर मस्तच. पण जर घरी करायचं असेल तर तेही करण्याचे फं डे तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात. मी हा फंडा अवलंबून घरच्यांना खूष करणार आहे. तुमचं काय?

 

Web Title: Smoky Tak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.