नासलेलं दूध टाकून देताय? त्याआधी 'हे' फायदे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 02:42 PM2019-03-01T14:42:47+5:302019-03-01T14:43:42+5:30
वातावरणामध्ये उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली असून थंडी हळूहळू नाहीशी होत आहे. बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम जसा आपल्या शरीरावर आणि त्वचेवर जाणवू लागतो. तसाच तो आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि पदार्थांवरही होत असतोच.
वातावरणामध्ये उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली असून थंडी हळूहळू नाहीशी होत आहे. बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम जसा आपल्या शरीरावर आणि त्वचेवर जाणवू लागतो. तसाच तो आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर आणि पदार्थांवरही होत असतोच. वातावरणातील उकाडा जसा वाढतो. तसचं स्वयंपाक घरातही त्याचा परिणाम होत असतो. वातावरणातील जास्त उष्णतेमुळे अनेकदा दूध नासण्याच्या गोष्टी घडत असतात. मग एवढं दूध वाया न घालवता त्याचं पनीर तयार करण्यात येतं. परंतु अनेकजण हे दूध टाकून देतात. खरं तर दूध नासल्यामुळे याची चवही बदलून कडवट आणि आंबट होते. त्यामुळे ते वाया घालवू नका. कारण नासलेलं दूध शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. खरं तर दूध कोणत्याही प्रकारात असलं तरिही त्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असतं. जाणून घेऊयात नासलेल्या दूधामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी कोणती पोषक तत्व असतात त्याबाबत...
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
नासलेल्या दूधाच्या पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतं. या पाण्याच्या सेवनाने स्नायू बळकट होण्यास मदत होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही मदत होते. याशिवाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
जर तुम्ही फाटलेल्या दूधाचं सेवन करत असाल तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात असेल तर हृदयासंदर्भातील समस्या म्हणजेच, हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोक इत्याही गोष्टींपासून बचाव करण्यास मदत होते.
जेवणाची चव वाढविण्यासाठी
नासलेल्या दूधाच्या पाण्याचा वापर तुम्ही पिठ मळण्यासाठी करू शकता. यामुळे पोळया नरम आणि चविष्ट होतता. तसेच यामुळे प्रोटीनची मात्राही वाढते.
चेहऱ्यावर ग्लो येतो
दूध ब्लड सर्क्युलेशन उत्तम करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे त्वचेच्या पेशी हेल्दी होतात. नासलेलं दूध बेसन, हळद आणि चंदनामध्ये एकत्र करून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. चेहरा चमकदार होण्यास मदत होते.
अंड्यासोबत एकत्र करून खा
नासलेलं दूध अंड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या भुर्जीसोबत खाऊ शकता. यामुळे अंड्याची भुर्जी आणखी स्वादिष्ट होण्यासोबतच शरीराला प्रोटीन मुबलक प्रमाणात मिळण्यासही मदत होते.