‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:30 AM2022-02-25T08:30:49+5:302022-02-25T08:31:19+5:30
जपानमध्ये याच साध्या चॉकलेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
कुरकुरीत वेफरला चॉकलेटचा थर लावून तयार केलेले किटकॅट भारतातल्या चॉकलेट, गोळ्यांच्या दुकानात एका कोपऱ्यात दिसते. काही विशेष म्हणून चॉकलेट विकत घ्यायचे असेल, तर क्वचितच आपण किटकॅट घेऊ. कारण त्याचे स्वरूपच साधेसुधे आहे. पण जपानमध्ये याच साध्या चॉकलेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
इतर देशांत किटकॅट म्हणजे मधून तोडता येईल अशाप्रकारे बनविलेले वेफर चॉकलेट, पण जपानमध्ये याची महतीच वेगळी आहे. इथे किटकॅट चक्क चारशेहून जास्त फ्लेवर्समध्ये मिळते. जपानी माणसांना किटकॅटचा जन्म जपानमध्ये न होता ब्रिटनमध्ये झाला हे सांगितले, तर पटणार नाही. इतके जपानने किटकॅटला जवळ केले आहे. एका स्ट्रॉबेरी मोसमाच्या सुरुवातीला किटकॅट उत्पादकांनी ठरवले की, वेफरच्या बाहेरच्या आवरणातल्या चॉकलेटमध्ये आपण स्ट्रॉबेरीची पूड घालुयात. जरा आंबटगोड लागणारे हे वेफर्स लोकांना आवडतात का बघूयात. कंपनीचा हा प्रयोग अपेक्षेपेक्षा फार म्हणजे फारच यशस्वी झाला आणि मग वेगवेगळ्या फ्लेवर्सचे किटकॅट बनू लागले. त्यातही इतके प्रयोग होऊ लागले की, काही किटकॅट वर्षातले काही दिवसच मिळतात, तर काही फ्लेवर्स विशिष्ट प्रांतातच मिळतात.
उदाहरणार्थ क्युश्यू आणि ओकीनावामध्ये रताळ्यासारख्या जांभळ्या कंदापासून बनविलेले किटकॅट मिळतात, तर नागोया प्रांतात चवळीसारख्या कडधान्यापासून बनवलेली किटकॅट तिथल्या कॅफेजमध्येसुध्दा असतात. शिझोकामध्ये वसाबीचा झिणझिण्या आणणारा स्वाद असलेली किटकॅट मिळते. बोटाच्या तीन पेरांएवढी किटकॅट सगळ्यात लोकप्रिय आहे. रोज चाळीस लाख छोट्या किटकॅट विकल्या जातात. १९३० च्या दशकात ब्रिटनमध्ये किटकॅटचा जन्म झाला. हे चॉकलेट कामगारांना कामातून ब्रेक मिळाला की सहज खाता येईल, त्यातून त्यांना तरतरी येईल, अशा मार्केटिंग स्ट्रॅटेजीने बनवले गेले होते. म्हणूनच ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’ अशी टॅगलाईन त्याला देण्यात आली. त्याची किंमत सगळ्यांना परवडेल अशी ठेवण्यात आली, पण इतर वेळी मनाची कवाडे बंद ठेवणाऱ्या जपानी जनतेने किटकॅटला मात्र मनापासून स्वीकारले आणि या साध्या चॉकलेटला शाही दर्जा मिळाला.
मुक्त पत्रकार
bhalwankarb@gmail.com