उन्हाळा आला, आता सरबत हाणा! प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितल्या सरबतांच्या खास रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:12 AM2022-04-10T11:12:13+5:302022-04-10T11:20:40+5:30
Vishnu Manohar: उन्हाच्या काहिलीने अंग भाजू लागलंय. दिवसागणिक पारा नवे उच्चांक गाठतोय. थंडाव्यासाठी सरबत घ्यायचं म्हटलं, तरी लिंबू सरबत किंवा कैरीचे पन्हे असे नित्याचे पर्याय आठवतात. रणरणत्या आणि डोके भणभणवणाऱ्या उन्हात थंडावा देणारी ही काहीशी वेगळी सरबतं, त्यांच्या कृतीसह खास तुमच्यासाठी...
- विष्णू मनोहर (प्रसिद्ध शेफ)
उन्हाच्या काहिलीने अंग भाजू लागलंय. दिवसागणिक पारा नवे उच्चांक गाठतोय. थंडाव्यासाठी सरबत घ्यायचं म्हटलं, तरी लिंबू सरबत किंवा कैरीचे पन्हे असे नित्याचे पर्याय आठवतात. रणरणत्या आणि डोके भणभणवणाऱ्या उन्हात थंडावा देणारी ही काहीशी वेगळी सरबतं, त्यांच्या कृतीसह खास तुमच्यासाठी...
तिखट सरबत
साहित्य : पुदिना अर्धी वाटी, हिरवी मिरची एक, किसलेली कैरी अर्धी वाटी, जिरे एक चमचा, साखर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, पाणी अर्धा लिटर
कृती : सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करा, चाळणीतून गाळून घ्या. थंड करून प्यायला द्या.
पुदिना सरबत
साहित्य : पुदिना एक वाटी, दोन लिंबांचा रस, एक चमचा तुळशीचे बी, साखर एक चमचा, मीठ अर्धा चमचा, पाणी अर्धा लिटर
कृती : पुदिना बारीक चिरुन किंवा कुटून अर्धा लिटर पाण्यात घाला, त्याचबरोबर इतर सर्व जिन्नस त्या पाण्यात घालून एकत्र करा. साखर व मीठ विरघळल्यावर थंड करून प्यायला द्या.
कोकम सरबत
साहित्य : कोकम (आमसूल) एक वाटी, साखर अर्धी वाटी, जीरे पावडर अर्धा चमचा, मीठ पाव चमचा.
कृती : सर्वप्रथम अर्धा लिटर पाण्यात कोकम घालून एकत्र करुन चांगले पिळून घ्या. नंतर यात साखर, मीठ व जीरे पावडर घालून घोळवून घ्या. थंडगार प्यायला द्या.
बेलफळ सरबत
वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात पिठीसाखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.
साहित्य : एका बेलफळाचा गर, पाव चमचा मीठ, दोन चमचे साखर
कृती : सर्व जिन्नस एकत्र करुन व मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्या. नंतर यात अर्धा लिटर थंड पाणी घालून प्यायला द्या.
लिंबू-सब्जा सरबत
साहित्य : तीन लिंबांचा रस, दोन चमचे सब्जा बी, मीठ चिमूटभर, साखर एक वाटी, खायचा चुना चिमूटभर
कृती : साखर, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा. नंतर यात अर्धा लिटर पाणी व दोन चमचे सब्जाचे बी घाला. १० ते १५ मिनिटे थंड करुन प्यायला द्या.