तुम्ही भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणतात आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यातच ठेवता का? मग हे घातकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:43 PM2017-08-09T18:43:56+5:302017-08-09T18:48:52+5:30
भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवल्यानं आता भाज्या ताज्या आणि सुरक्षित राहतील असा आपला समज असतो तो साफ खोटाच. उलट प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठेवलेल्या भाज्या फळं आरोग्याचा घात करतात.
- माधुरी पेठकर
प्लॅस्टिकच्या पिशव्या जणू जीवनावश्यक घटकच बनल्या आहेत असंच वापरतो आपण. दुकानातून वाणसामान आणण्यापासून ते भाजी बाजारातून भाज्या आणि फळं आणण्यापर्यंत आपण प्लॅस्टिक पिशव्याच वापरतो. बाजारात जाताना कापडी पिशवी घेवून जाण्यात अनेकांना अजूनही कमीपणाच वाटतो. इतकंच कशाला सोबत कापडी पिशवी असतानाही घरी भाज्या बिज्या ठेवायला बर्या म्हणून दुकानदाराकडे, भाजीवाल्याकडे प्लॅस्टिकची पिशवीच मागितली जाते.
वाण सामान, भाज्या -फळं प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणणं ठीक पण भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीतच ठेवणं हे मात्र घातकच. भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवल्यानं आता भाज्या ताज्या आणि सुरक्षित राहतील असा आपला समज असतो तो साफ खोटाच. भाज्या फळं साठवताना काय चुकीचं काय बरोबर याचा विचार केला तरच आपण घरी साठवतो त्या भाज्या फळं खाण्यास सुरक्षित राहू शकतात.
प्लॅस्टिकच्या पिशवीत भाज्या आणि फळं ठेवल्या तर त्या ताज्या राहतात असं नाही उलट अशा भाज्यांमध्ये शरीरास हानिकारक जीवाणू वाढतात. भाज्या आणि फळांना प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरून ठेवल्यानं त्या ताज्या राहत नाही. उलट अशा पिशव्यांमुळे भाज्या आणि फळांना श्वास घ्यायला जागाच राहात नाही. प्लॅस्टिकची पिशवी ही काही नैसर्गिक गोष्ट नाही. उलट ती रसायनांपासून बनवली जाते. अशा पिशवीत फळं आणि भाज्या भरून ठेवल्यानं हे रसायनं भाज्या आणि फळांमध्ये शिरतात. प्लॅस्टिक पिशव्यांमधील हे रसायनं शरीरास अत्यंत घातक असतात. त्यांच्यामुळे पेशींचा मूळ आकार बदलतो, शरीरातील जनुकीय साखळी बिघडते, मुला-मुलींना लवकर तारूण येतं तसेच संप्रेरकांंमध्ये अर्थात हार्मोन्समध्ये घातक बदल होतात. म्हणून तज्ञ्ज्ञांच्या मते भाज्या आणि फळं साठवताना खाकी कागदी पिशव्यांचा किंवा उच्च प्रतीच्या पॉलिथीन पिशव्यांचा वापर करावा. पण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा.
भाज्या आणि फळं ठेवताना खास रेफ्रिजरेटर बॅग्जचा वापर करत असला तरी प्रत्येकवेळी भाजी काढून पिशवी रिकामी केल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यावी. ती पिशवी व्यवस्थित कोरडी करूनच त्यात नवीन भाजी भरावी. पिशवी स्वच्छ न करता एका मागोमाग भाज्या भरल्या तर पिशव्यांच्या आत जीवाणूंची वाढ होते आणि ती शरीरास हानिकार ठरते.
हे कराच!
1) सफरचंद सारखी फळं आणल्यानंतर ती थेट प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा ती बाहेर थंड ठिकाणी मोकळी करून ठेवली तरी चालतात. अशा ठिकाणी ठेवलेली सफरचंद दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. त्यापेक्षा जास्त टिकवायची असतील तर फ्रीजमधील कार्डबोर्ड बॉक्समध्ये मोकळीच ठेवावीत.
2) स्ट्रॉबेरीजसारखं नाजूक फळ ओलसरपणापासून दूर राहायला हवं. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं तर ओलसरपणा आपोआप निर्माण होतो. आणि फळ खराब होतं. म्हणून स्ट्रॉबेरीज या कागदी पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात.
3) टोमॅटो तर अनेकजण फ्रीजमध्येच ठेवतात. खरंतर टोमॅटो बाहेरच चांगले राहातात. जास्त पिकलेले टोमॅटो वेगळे करून तेवढे फक्त फ्रीजमध्ये ठेवावेत आणि लगेच वापरून संपवावेत.
4)बटाटे, लसूण, कांदा या गोष्टी तर कधीच प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू नये. ते बाजारातून आणल्यानंतर लगेच मोकळेकरून बाहेर थंड आणि कोरड्या जागेत ठेवावेत.
5) हिरव्या भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठेवू नये. मेथी, कोथिंबीर सारख्या भाज्यांची जुडी सोडून ती निवडून ओलसर कपड्यात घट्ट गुंडाळून ठेवावी. हिरव्या भाज्या कोरड्या होवू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवाव्यात पण प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही. आणि त्या लगेच वापरून संपवाव्यात.