रस्त्यावर खाणार, त्याला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 01:26 PM2023-06-04T13:26:58+5:302023-06-04T13:28:52+5:30
भारतभर फिरलात, तर रस्त्यात आणि सस्त्यात नेमकं काय खाल?
मुंबई असो, की भारतातले इतर कोणतेही शहर. अगदीच एखादे खुर्द किंवा बुद्रुक. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावरचे खाणे मिळतेच. स्वस्त, पोट भरणारे, चटकन उभ्या उभ्या खाऊन- हात पुसून मोकळे होता यावे हा अशा खाण्यामागचा उद्देश. पूर्वी अशा खाण्याला अनहायजिनिक म्हणणारे परदेशी पर्यटकही हल्ली स्ट्रिट फूड चाखायला तयार असतात. त्यामुळेच केंद्र सरकार अशा खाण्यासाठी देशभरात १०० रस्ते राखून ठेवणार आहे. तुम्ही भारतभर फिरलात, तर रस्त्यात आणि सस्त्यात नेमकं काय खाल?
कामानिमित्त असो, की फिरायला... आपण कुठेही गेलो, तरी त्या त्या भागातील चव चाखण्याचा, तिथले खास पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो. अशा खाण्यातूनही ते प्रदेश समजून घ्यायला मदत होते. कधी तिथले मसाले वैशिष्ट्य दाखवून देतात. तर कधी साहित्य तेच असते, पण पदार्थ तयार करण्याची पद्धत तुमच्या जिभेवर त्या प्रांताची ओळख रेंगाळत ठेवते.
जसं दक्षिणेत गेल्यावर तांदूळ आणि उडदापासून तयार होणारे पदार्थ ही खासियत म्हणून समोर येते. इडली, डोसा, डाळवडा, आप्पे, रस्सम, पोंगल, पायसमशिवाय तिथले पान हलत नाही. नारळ, खोबरेल तेल, कच्ची केळी यांचा सढळ हस्ते वापर होताना दिसतो.
गुजराती जेवणात तिखटाचा वापर कमी असला, तरी भरपूर पदार्थ तुम्हाला वेगवेगळी चव चाखण्याची संधी देतात. जेवणातील फरसाण, खमण, गोड पदार्थ तुमचे ताट आणि मन भरून टाकतात.
उत्तर भारतात मोहरीच्या तेलाचा, साजूक तुपाचा वापर होतो. जेवण अधिक मसालेदार होत जाते. त्याचवेळी लिट्टी चोखा, दाल-बाटीसारखे भट्टीत भाजलेले पदार्थ रूची वाढवतात. राजस्थान, गुजरातचा कच्छसारखा भाग असेल तर वाळवून साठवलेल्या पदार्थांवर भर असतो.
पंजाब, हिमाचल प्रदेश, काश्मीर, बिहार, मध्य भारतात तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती जेवणात दिसून येते. धान्य, भाज्यांचा वापर वाढतो. दूध-दुभत्याचे पदार्थ वाढतात. उत्तर भारतापासून पार पंजाबपर्यंत गंगा नदीने सुपीक केलेले परिसर तुम्हाला विपुल धनधान्यातून भेटतात. ईशान्य भारतातही हिरवेगार प्रदेश तुम्हाला त्या त्या ऋतुनुसार विपुल अन्न देतात.
या साऱ्या प्रदेशांत सर्वसाधारणपणे आढळणारी ही खासियत जशी तेथील रोजच्या जेवणात दिसते, तशीच ती रस्त्यावरच्या खाण्यातही दिसते. त्यामुळे त्या त्या भागात फिरताना रस्त्यावरचे खाणे जरी पाहिले तरी स्थानिकांचे रोजचे खाणे नेमके कसे आहे हे सहज समजून येते. खाद्यसंस्कृतीची छान ओळख होते.
घरगुती चवीला पसंती
ताजे, मसालेदार, गरमागरम खातानाही त्या त्या प्रदेशातील घरगुती चवीचे खाणे मिळाले तर त्याला अधिक पसंती मिळते. त्यामुळेच मोठ्या हॉटेलपेक्षाही छोट्या गाड्या- टपऱ्या, घरगुती खानावळी इथे मिळणाऱ्या स्ट्रिट फूडला अधिक मागणी असते.
खाण्यासोबत पिणेही
चहा (मसाला घातलेला, गवती चहा घातलेला, आले- वेलची घातलेला, पुदिना घातलेला, दालचिनी घातलेला, कोरा; पण लिंबू पिळलेला असा प्रदेशानुसार वेगवेगळा), कॉफी (खास करून दक्षिणेतली फिल्टर कॉफी), उकाळा, लस्सी, ताक, सरबते, फालुदा, आइस्क्रीम, फळांचे रस, दूध, ठंडाई.
मुंबईत काय खाल?
- वडापाव
- पावभाजी
- मिसळ
- वडा-उसळ
- भेळ
- भुट्टा (पावसाळ्यात)
- कांदाभजी
फूड ट्रक रुळतोय
दुपारचे जेवण असो, की संध्याकाळचे खाणे... छोटे ट्रक-टेम्पो किंवा रिक्षा यातून वेगवेगळे ट्रे, भांडी, डबे यातून आणले जाणारे जिन्नस हेही आता अंगवळणी पडू लागले आहे.
वेगवेगळ्या राज्यांची खासियत
- प. बंगाल : पुचका (पाणीपुरी), झाल मुरी
- गुजरात : दाबेली, खमण
- दिल्ली, कोलकाता, हिमाचल : मोमो
- कर्नाटक : अक्की रोटी
- हैदराबाद : चारमिनारची मिरची भजी
- पंजाब : छोले भटुरे, लस्सी
- बिहार : लिट्टी चोखा
- मध्य प्रदेश : पोहे, जिलेबी
- राजस्थान : बिकानेरी कचोरी
- दिल्ली : भल्ला पापडी
- बंगाल : घुगनी चाट
- चेन्नई : इडली साबार
- दिल्ली : नागोरी हलवा, बेडमी पुरी, दौलत की चाट, राम लड्डू, मटार कुलचा
- जयपूर : कांजी वडा
- राजस्थान : नसीराबाद की कचोरी
- दक्षिणेत : दाल वडा
- दिल्लीसह उत्तर भारत : आलू टिक्की. तीही वेगवेगळ्या प्रकारे मिळते. काही भागात ती पॅटीससारखी असते, तर काही ठिकाणी उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून दिली जाते.)