नावडतीचं दूध आवडतीचं करण्यासाठी हे उपाय करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:51 PM2017-11-23T17:51:06+5:302017-11-23T18:01:58+5:30

दूध न पिण्याची वास, चव,पचनसंबंधीची वेगवेगळी कारणं पुढे करून आपण दूध टाळत असतो. पण दूध पिण्याचं टाळताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण दूधातून मिळणा-या पोषकतेलाही नाकारत असतो. दूध पिताना त्यात काही गोष्टी जर मुद्दाम घातल्या तर दूध आवडीनं प्यायलं जातं शिवाय दूधातून                    मिळणा-या पोषणमूल्याचीही वाढ होते.

Tasty tips for make a milk favourite one | नावडतीचं दूध आवडतीचं करण्यासाठी हे उपाय करा!

नावडतीचं दूध आवडतीचं करण्यासाठी हे उपाय करा!

Next
ठळक मुद्दे* दूध आणि मध हे वाढत्या वयाच्या मुलांना नेहमी द्यायला हवं असं कॉम्बिनेशन आहे.* वाढत्या मुलांबरोबरच महिलांसाठीही दूध-खारीक हा पौष्टिक आहाराच्या यादीत वरचे स्थान पटकावितो.* जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, किंवा मग तुम्ही वारंवार सर्दीमुळे त्रस्त असाल तर मग तुळशीची पानं घालून उकळलेलं दूध पिणं हा सर्वात उत्तम उपाय आहे.

 

- सारिका पूरकर-गुजराथी


दूध.आरोग्याच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा घटक मानला गेला आहे. कॅल्शियमचा खजिना म्हणूनही दूधाची ओळख करु न दिली जाते. कारण दिवसभरासाठी आपल्या शरीराला आवश्यक असणा-या कॅल्शियमच्या कोट्यातील 45 टक्के कोटा हा केवळ दुधामुळे कव्हर होतो. तर असे हे बहुमूल्य दूध, आपण रोज म्हणजे अगदी न चुकता एक तर सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा रात्री झोपताना तरी घ्यायला हवं.

परंतु, आपण सगळे कितीजण हा नियम पाळतो? दूध न पिण्याची वास, चव,पचनसंबंधीची वेगवेगळी कारणं पुढे करून आपण दूध टाळत असतो. पण दूध पिण्याचं टाळताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण दूधातून मिळणा-या पोषकतेलाही नाकारत असतो. दूध पिताना त्यात काही गोष्टी जर मुद्दाम घातल्या तर दूध आवडीनं प्यायलं जातं शिवाय दूधातून मिळणा-या पोषणमूल्याचीही वाढ होते.


नावडतीचं दूध आवडतीचं करण्यासाठी
1) दूध-जायफळ पावडर : दूधामध्ये अमिनो अ‍ॅसिड ट्रिपोफॅम हा घटक असतो. या घटकामुळे आपल्या झोपेसाठी आवश्यक समजली जाणारी मेंदूतील काही रसायनांची ( सेराटोनिन व मेलाटोनिन ) निर्मिती होते. आणि जर तुम्ही दूधात जायफळ पावडर घालून दूध प्यायलात तर जायफळामुळे ही रसायनं अधिक प्रमाणात तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळू शकते. फक्त प्रमाणातच जायफळ पूड वापरली जायला हवी.
2) दूध -मध- वाढत्या वयाच्या मुलांना नेहमी दिले पाहिजे असे हे कॉम्बिनेशन आहे. कारण यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्यांना ताकद देखील येते.याव्यतिरिक्त दूध-मधाच्या सेवनामुळे चांगलं पचन होऊन शरीराचं पोषणही उत्तमरित्या होतं.

 

3) दूध-खारीक - लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कल्शियम हे एकत्रित हवं असेल तर दूध-खारीकला आजघडीलाही दुसरा पर्याय नाही. वाढत्या मुलांबरोबरच महिलांसाठीही दूध-खारीक हा पौष्टिक आहाराच्या यादीत वरचे स्थान पटकावितो. शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करणा-यासाठीही हा उपाय वरदान ठरतो. त्यामुळे दूधाबरोबर खारीक ट्राय कराच.
4) दूध-हळद - भारतात आई-आजी यांच्या औषधी बटव्यातील सर्वात जुना प्रभावी नुसका. हळद ही जंतूनाशक असल्यामुळे ती दूधात घालून देण्याची खूप चांगली प्रथा आपल्याकडे आढळते. दूधात हळद घालून प्यायल्यामुळे कोरडा खोकला, कफ या विकारात लाभ होतोच शिवाय शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीरातील काही उपद्रवी घटकांचा सफाया देखील यामुळे होतो. कर्करोग प्रतिबंधक म्हणूनही हळद ओळखली जाते. शिवाय हळदीचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे दूधात हळद घालून प्यायला सुरूवात करायला हवी.
5) दूध-बदाम :- दूधात कॅल्शियम तर बदामात प्रोटीन, व्हिटॅमिन, कल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे सारं काही मिळतं. तर मग हे दोन्ही घटक एकत्र केले तर मिळणा-या गुणांमध्ये दुपटीनं वाढ होते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी तर बदामाइतकं दुसरं फायदेशीर काही नाही. हाडांचा बळकटपणा, रक्तदाब,पचनक्रिया हे जर सुरळीत ठेवायचे असेल तर दूध-बदाम बेस्ट पर्याय आहे.

6) दूध-तुळस-काळी मिरी - जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, किंवा मग तुम्ही वारंवार सर्दीमुळे त्रस्त असाल तर मग तुळशीची पानं घालून उकळलेलं दूध पिणं हा सर्वात उत्तम उपाय आहे. दूूधात तुळशीची पानं घालून एक उकळी आली की मग थोडी काळीमिरी पावडर घालावी . दुधातील या घटकांमुळे शरीरातील विषारी जीवाणूंचा नायनाट होतो तसेच सर्दीमुळे होणा-या कफ, खोकल्यालाचा त्रासही कमी होतो.
7) दूध-मिक्स मसाला : नाही, हे कोजागिरीचं मसाला दूध नाहीये तर हे आरोग्यवर्धक मसाला दूध आहे. जायफळ, लवंग, वेलदोडे, दालचिनी, सुंठ, काळीमिरी एकत्र बारीक करून हा मसाला दूधात घालून दूध उकळल्यास दूध चविष्ट आणि पौष्टिक होतं.
8) दूध-केशर - थंडीच्या दिवसात शरीरास गरम ठेवायचं असेल तर केशर घातलेलं दूध घ्यायला हवं.
9) दूध प्यावं उकळून: आपण दूध आणलं की आधी ते तापवतो. अनेक घरात सहसा एकदाच दूध तापवलं जातं. परंतु, नॅशनल डेअरी डेव्हलपमेण्ट बोर्डचा अभ्यास सांगतो की तसं न करता दूध दिवसभरातून तीनवेळा तापवलं तरच त्यातील बॅक्टेरिया निघून जाऊन त्यातील आरोग्यदायी घटकाचा लाभ आपल्याला मिळतो.

 

 

Web Title: Tasty tips for make a milk favourite one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.